नवी दिल्ली,
NIA raids in Anantnag राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी सकाळी दोन प्रमुख ठिकाणी जोरदार शोधमोहीम राबवली. या धडक कारवाईत केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे सहभाग घेतला. या मोहिमेदरम्यान बिजबेहरा येथील सिकॉप (एससीओ) कार्यालय आणि दूरू परिसरातील क्रेरी गावात असलेल्या एका निवासी घराला लक्ष्य करण्यात आले. एनआयएच्या पथकांनी सिकॉप बिजबेहरा येथील अमली पदार्थांचा संशयित तस्कर गुलाम नबी हाजम आणि क्रेरी डोरू येथील सुहेल घनी भट यांच्या निवासस्थानी हे छापे टाकले. ही कारवाई एका चालू तपासाचा भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून, या प्रकरणाचा तपशील संध्याकाळपर्यंत एनआयएकडून अधिकृत निवेदनाद्वारे जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा यंत्रणांनी मोबाईल फोनसह अनेक डिजिटल उपकरणे हस्तगत केली असून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली जाणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी नेटवर्क आणि त्यांच्या आर्थिक व रसद व्यवस्थेचे जाळे मुळासकट उखडून टाकण्यासाठी एनआयए गेल्या काही वर्षांपासून खोऱ्यात सातत्याने अशा कारवाया करत आहे.दुसरीकडे, कठुआ जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी गुरुवारी उधमपूर-कठुआ सीमेजवळील बिल्लावरच्या जंगलात मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा बिल्लावर भागातील एका घरावर अज्ञात व्यक्तींनी थाप मारली होती. कुटुंबाने भीतीपोटी दरवाजा उघडला नाही, मात्र दुसऱ्या दिवशी घरातील अन्न गायब असल्याचे आढळल्याने तेथे कोणीतरी घुसल्याचा संशय बळावला. या घटनेनंतर कठुआचे पोलीस अधीक्षक (ऑपरेशन्स) प्रीतपाल सिंग यांनी सांगितले की, सीमावर्ती भागात सतर्कता बाळगण्यासाठी आणि संशयितांचा सुगावा लावण्यासाठी अशा प्रकारच्या नियमित व विशेष शोधमोहिमा सातत्याने राबवल्या जात आहेत.