कांदा बाजारात आवकेचा महापूर

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
सोलापूर
onion श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी कांद्याची आवक विक्रमी पातळीवर पोहोचली. एकाच दिवसात तब्बल ३२५ ट्रक कांदा बाजारात दाखल झाल्याने खरेदी-विक्रीतून ६ कोटी ५६ लाख २१ हजार रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल झाली. मात्र, बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढताच दरात प्रति क्विंटल तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीशी चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे.
 

onion 
गेल्या काही दिवसांपासून सोलापूरच्या बाजारपेठेत अहिल्यानगर, पुणे आणि बीड जिल्ह्यांतून कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मंगळवार ते शुक्रवार या चार दिवसांत बाजारात २५ हजार २३९ क्विंटल म्हणजेच ५० हजार ४७८ पिशव्या कांदा दाखल झाला होता. त्यातच शनिवारी एकाच दिवसात ३२५ ट्रक कांदा बाजारात आल्याने बाजार समितीच्या आवारात वाहनांची मोठी गर्दी झाली होती.
शनिवारी बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याला कमाल ३८०० ते ४००० रुपये, तर किमान ५०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. अवघ्या दोन ते तीन दिवसांत कांद्याच्या दरात सुमारे एक हजार रुपयांची घट झाली आहे.
दरम्यान, नाफेडचा राखीव कांदा बाजारात दाखल झाल्यास दर आणखी घसरतील, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. याच भीतीपोटी शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणत असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी बाजारातील आवक सातत्याने वाढत आहे.
कांद्याची आवक अशीच वाढत राहिल्यास येत्या सोमवारी बाजारात नेमका किती भाव मिळेल, हे सांगणे अवघड असल्याचे कांदा व्यापारी सादीक बागवान यांनी सांगितले. त्यामुळे वाढलेल्या आवकेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत कांद्याच्या दराची दिशा काय राहणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.