पद्मश्री सौकार जानकी यांचे निधन

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
चेन्नई,
Padma Shri Sowcar Janaki passes away दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सौकार जानकी यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. उपचारासाठी त्यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, अनेक दिवसांच्या उपचारानंतर शुक्रवारी दुपारी १ वाजून ५९ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता नासर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.सौकार जानकी यांच्या निधनाची बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांसह दाक्षिणात्य मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली. अनेक दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला.
 
 
 
पद्मश्री सौकार जानकी यांचे निधन
आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे कन्नड भाषिक कुटुंबात सौकार जानकी यांचा जन्म झाला. त्यांचे लग्न लहान वयातच श्रीनिवास राव यांच्याशी झाले. विशेष म्हणजे, गरोदर असतानाही त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. गरोदरपणात त्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यानंतर आसाममधील गुवाहाटी युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी सौकार जानकी यांनी आकाशवाणी मद्रास अर्थात ऑल इंडिया रेडिओमध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली.
 
 
१९५० मध्ये एल. व्ही. प्रसाद यांच्या दिग्दर्शनाखालील ‘शावुकारु’ या तेलुगु चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर १९५२ मध्ये टी. आर. सुंदरम यांच्या ‘वलयापती’ या तामिळ चित्रपटातून त्यांनी तामिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढील काळात त्यांनी दक्षिण भारतातील विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये उल्लेखनीय काम केले. चित्रपटांसोबतच त्यांनी दूरदर्शनवरील मालिकांमध्येही अभिनय केला. सिनेसृष्टीतील त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने सौकार जानकी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते. त्यांच्या निधनाने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एका प्रदीर्घ आणि समृद्ध अभिनय पर्वाचा अंत झाला आहे.