अनिल कांबळे
नागपूर,
police patils राज्यातील अनेक पोलिस पाटलांची पदे रिक्त असून, पोलिस पाटील म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तींना विविध शासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. तसेच अनेक पोलिस पाटील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतलेले आहेत तसेच काही उच्चशिक्षितसुद्धा आहेत. महसूल आणि गृह विभागाशी संबंधित विविध कामांचा अनुभव असल्याने त्यांच्या शैक्षणिक पात्रता व सेवाज्येष्ठतेचा विचार करून महसूल आणि गृह विभागातील पदांच्या भरतीमध्ये पोलिस पाटलांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
पोलिस पाटलांना शासनाकडून सोयी-सुविधा देण्यासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले. पोलिस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात नागपुरात बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. कोराडी येथे पोलिस पाटील प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी शालिनी नागमिरे, रूपाली काळे, भूमिका मुनगे, राम वाघमारे यांच्यासह पोलिस पाटील उपस्थित होते. संघटनेने पोलिस पाटलांसाठी २० टक्के आरक्षणाची तरतूद करावी, ही प्रमुख मागणी निवेदनातून केली. महसूल आणि गृह विभागातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याऐवजी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या पोलिस पाटलांना या पदांच्या भरतीमध्ये संधी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. महसूल आणि गृह विभागातील विविध पदांच्या भरतीमध्ये पोलिस पाटलांना त्यांच्या अनुभवाचा आणि शैक्षणिक पात्रतेचा लाभ मिळावा, तसेच शासनाच्या विविध योजनांमध्ये त्यांना अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा पोलिस पाटील प्रतिनिधींनी व्यक्त केली.