पुणे
rahul gandhi लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे पुण्यात आगमन झाले असून, पुणे विमानतळावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि बेज रंगाची पँट अशा कॅज्युअल, मात्र आकर्षक वेशभूषेत राहुल गांधी विमानतळावर दाखल झाले. विमानतळावरून ते थेट हॉटेलच्या दिशेने रवाना झाले असून, त्यानंतर कार्यक्रमस्थळी जाणार आहेत.
पुण्यातील आरटीओजवळील ‘एआयएसएसएमएस’ (AISSMS) शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर काँग्रेसच्या देशव्यापी अभियानाचा चौथा टप्पा असलेल्या ‘छात्रों की गूंज’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राहुल गांधी विद्यार्थिनी आणि तरुणींशी थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त व्यासपीठावर एकही राजकीय नेता उपस्थित राहणार नाही.
सायंकाळी सहा वाजता राहुल गांधी यांच्या भाषणाला सुरुवात होणार असून, त्यानंतर ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरे देणार आहेत. शिक्षण, वाढती बेरोजगारी आणि महिला सुरक्षा या प्रमुख मुद्द्यांवर ते सविस्तर भूमिका मांडणार आहेत. पुण्यातील तरुणी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी नेमकी कोणती भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याने मोठ्या गर्दीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांकडून सुमारे ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारासह वाहनतळ आणि प्रमुख चौकांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.