मुंबई
salman khan बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अभिनेता सलमान खान याच्या फिटनेस ब्रँडअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या जिमला गुरुवारी रात्री अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास-1 या उच्चभ्रू भागात ही घटना घडली. जिमच्या पहिल्या मजल्यावरून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, पोलीस आणि अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पीटीआयच्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास जिममध्ये आग लागली. पहिल्या मजल्यावरून अचानक आगीच्या ज्वाळा वर येताना दिसताच तेथील नागरिक आणि जिममध्ये उपस्थित असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई करत अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच जिममधील सर्व लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर वेळेत नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे ग्रेटर कैलास-1 परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून त्याचा शोध घेतला जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जिम सलमान खानच्या स्वतःच्या फिटनेस ब्रँडअंतर्गत चालवली जात आहे.सलमान खानला देशातील प्रमुख ‘फिटनेस आयकॉन’ म्हणून ओळखले जाते. तो सातत्याने आपल्या चाहत्यांना तंदुरुस्त राहण्याचा सल्ला देत असतो. नुकतेच त्याने सोशल मीडियावर आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केले होते. या फोटोंनी त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. चित्रपटांसोबतच सलमान खान त्याच्या फिटनेससाठीही कायम चर्चेत असतो.आगीच्या घटनेनंतर पोलिसांनी प्रभावित परिसर सील केला असून फॉरेन्सिक आणि तांत्रिक पथकांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीमागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.