कोलंबो,
team india भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत १६५ धावांनी पराभव पत्करल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटीसाठी संघरचनेत मोठे बदल केले आहेत. २३ ऑगस्टपासून कोलंबो येथे सुरू होणाऱ्या निर्णायक सामन्यासाठी श्रीलंकेने १४ सदस्यीय संघ जाहीर केला असून, पहिल्या सामन्यातील संघातील काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतल्याने श्रीलंकेसाठी हा सामना मालिका वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

धनंजया डी सिल्वाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ दुसऱ्या कसोटीत मैदानात उतरणार आहे. संघातील सर्वात महत्त्वाचा बदल सलामीच्या फळीत होण्याची शक्यता आहे. पथुम निसांका दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नसल्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर पहिल्या कसोटीत अपेक्षित कामगिरी न करू शकलेल्या निशान मदुष्कालाही संघातून वगळण्यात आले आहे. पहिल्या कसोटीत त्याला केवळ ६ धावा करता आल्या होत्या.याशिवाय फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू रमेश मेंडिस आणि डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका यांनाही दुसऱ्या कसोटीच्या संघातून वगळण्यात आले आहे. या बदलांमुळे श्रीलंकेच्या प्लेइंग-११मध्ये पहिल्या कसोटीच्या तुलनेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पथुम निसांका आणि दिनेश चांदीमल उपलब्ध नसल्याने कामिल मिशारा आणि साहन अरच्चिगे यांना यापूर्वीच संघात स्थान देण्यात आले आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी श्रीलंकेच्या संघात लाहिरू उदारा, कामिल मिश्रा, पसिंदू सूरियाबंदरा, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा, सहान अरचाईगे, सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला, केसारा नुवांथा, प्रभात जयसूर्या, मिलन रथनायक, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो आणि विश्वा फर्नांडो यांचा समावेश आहे. या नव्या संघरचनेतून भारताविरुद्ध जोरदार पुनरागमन करण्याचे श्रीलंकेचे प्रयत्न असतील. गॉल येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मजबूत ठेवली होती. भारताने पहिल्या डावात ४६२ धावा उभारल्या. त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांवर संपला आणि भारताला १७८ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताने १९३ धावा करत श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७२ धावांचे आव्हान ठेवले. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव २०६ धावांवरच आटोपला. परिणामी भारताने पहिली कसोटी १६५ धावांनी जिंकत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.