साखरेनंतर गुळाचेही दर कडाडले

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर
jaggery prices राज्यातील बाजारपेठेत साखरेच्या दरवाढीने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत असतानाच आता गुळाच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या किरकोळ बाजारात गुळाचा दर आता 80 ते 85 रुपये किलोवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी हाच गूळ 60 रुपये किलो दराने मिळत होता. त्यामुळे पंधरा दिवसांत गुळाच्या दरात तब्बल 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे.
 

sugar price hike in maharashtra: after sugar, jaggery prices surge to rs 85 per kg 
दहा किलोची भेली खरेदी केल्यास घाऊक बाजारात गुळासाठी 70 ते 75 रुपये किलो दर मोजावा लागत आहे. अचानक गुळाच्या किमतीत झालेल्या या वाढीमागे बाजारातील पुरवठा, उत्पादन आणि मागणीतील बदल यापैकी नेमके कोणते कारण आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर गुळाच्या दरात झालेल्या वाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात साखरेच्या दरानेही मोठी उसळी घेतली आहे. साखरेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वाढ असल्याचे चित्र असून, साखरेचा दर 7 हजार 500 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. वाशिम जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर 80 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. आगामी काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
साखर आणि गुळाच्या दरवाढीचा परिणाम आता मिठाई व्यवसायावरही होऊ लागला आहे. मिठाई तयार करण्यासाठी साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने साखरेच्या किमती वाढल्यानंतर मिठाई उत्पादकांचा उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी, आगामी काळात मिठाईच्या दरांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये साखरेचे किरकोळ दर पाहिल्यास सांगली, बुलढाणा आणि वाशिममध्ये साखरेचा दर सुमारे 80 रुपये किलो आहे. कोल्हापूर आणि नाशिकमध्ये 75 रुपये, तर पुण्यात 72 रुपये किलो दर आहे. परभणी, सातारा, पालघर, भंडारा, लातूर आणि हिंगोलीमध्ये साखरेचे दर सुमारे 70 रुपये किलो आहेत. जळगावमध्ये 68 रुपये, अकोल्यात 65 रुपये, रत्नागिरीत 62 रुपये, तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुमारे 60 रुपये किलो दर आहे.
नागपूरमध्ये साखरेचा दर 68 ते 70 रुपये किलो, गोंदियात 70 रुपये, भंडाऱ्यात 68 रुपये, तर वर्ध्यात 62 ते 64 रुपये किलो आहे. अमरावतीमध्ये साखरेचा दर 75 रुपये, यवतमाळमध्ये 75 ते 78 रुपये, तर पालघरमध्ये 65 ते 70 रुपये किलोपर्यंत आहे. नांदेडमध्ये 65 रुपये किलो, तर मुंबईत काही ठिकाणी 60 ते 65 रुपये किलो दराने साखर मिळत आहे.
साखरेनंतर गुळाचे दरही वाढल्याने सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या खर्चात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात साखर आणि गुळाच्या दरांची दिशा काय राहते, तसेच या दरवाढीचा मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमतींवर किती परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.