तहसीलदारांना अश्लिल भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
लाखांदुर 
tehsildar एका व्यक्तीच्या मालकीच्या घरामध्ये भाड्याने सुरू असलेल्या तलाठी कार्यालयाच्या थकबाकी भाड्याच्या देयकावरून एका शिक्षकाने मोबाईल फोनवरून थेट तहसीलदारांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक परमानंद दहिवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

teacher allegedly abuses tehsildar and issues death threat over pending rent payment 
पोलिस सुत्रानुसार, काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील पारडी गावात सुधीर दहिवले यांच्या मालकीच्या घरात भाड्याने तलाठी कार्यालय सुरू होते. या भाड्यापोटी शासनाच्या महसूल प्रशासनाकडे एकूण १७ हजार रुपये भाडे थकीत असल्याचा आरोप आहे. दरम्यान, या भाड्याच्या रकमेच्या भुक्तानसाठी घरमालकाने स्थानिक तहसीलदारांकडे अर्जाद्वारे मागणीही केली होती. यादरम्यान घटनेच्या दिवशी दुपारी तहसीलदार पवार तहसील कार्यालयात उपस्थित होते. त्यावेळी घटनेतील आरोपी शिक्षकाने मोबाईलवरून तहसीलदारांना फोन करून तलाठी कार्यालयाच्या भाड्यावरून शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिली.
विशेष म्हणजे, तलाठी कार्यालयासाठी भाड्याने घेतलेल्या घराचा मालक दुसरी व्यक्ती असतानाही आरोपी शिक्षकाने भाड्याच्या भुक्तानसाठी थेट तहसीलदारांना फोनवर शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिल्यामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी स्थानिक तहसीलदारांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.