छत्रपती संभाजीनगर,
Three killed on Khavadya mountain तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी (२१ ऑगस्ट) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. देवळाई सातारा भागातील रहिवासी असलेल्या कुणाल मुरलीधर चांदवडे या १८ वर्षांच्या तरुणाचा 'आयफोन १५' मोबाईल खरेदी करण्यावरून वडिलांसोबत वाद झाला होता. याच हट्टातून तो सकाळी १० वाजता आत्महत्या करण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला. ही माहिती मिळताच त्याचे वडील मुरलीधर चांदवडे, आई संगीता चांदवडे, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान त्याला वाचवण्यासाठी तातडीने तेथे धावले.
कुणालला आत्मघाती पाऊल न उचलण्याची विनंती पोलीस, अग्निशमन दल आणि त्याची आई सलग ३ तास करत होते. पोलिसांच्या डायल ११२ चे कर्मचारी सुरेश भिसे आणि त्यांचे सहकारी त्याला समजावत असताना, अग्निशमन दलाने बचावासाठी पायथ्याशी जाळी लावली होती. मात्र, कुणाल जवानांना चकमा देत वारंवार आपली जागा बदलत होता. गेल्या वर्षीही तो याच डोंगरावर जीव देण्यासाठी गेला होता, तेव्हा एमआयडीसी वाळूज आणि चिकलठाणा पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला सुरक्षित खाली उतरवले होते.
अखेर कुणालने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला असता, गर्दीतून पुढे आलेल्या वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोल गेल्याने मुलगा आणि वडील दोघेही खोल दरीत कोसळले. आपला मुलगा आणि पती डोळ्यांसमोर खाली पडल्याचा तीव्र धक्का बसल्याने आई संगीता यांनीही तात्काळ डोंगरावरून उडी मारली. या दुर्दैवी घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला असून पोलीस आणि बचाव पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.