‘टॉक्सिक’च्या ॲडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद

अवघ्या 6 तासांत 30 हजार तिकिटांची विक्री

    दिनांक :22-Aug-2026
Total Views |
मुंबई
toxic अभिनेता यश आणि कियारा अडवाणी यांच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा चित्रपट 26 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून, प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच शुक्रवार, 21 ऑगस्टपासून चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. बुकिंग सुरू होताच ‘टॉक्सिक’ला मिळालेला प्रतिसाद पाहता चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 

toxic advance booking creates a buzz: yash and kiara advani film sells 30,000 tickets in just 6 hours 
‘टॉक्सिक’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवातीपासूनच तुफान प्रतिसाद मिळाला. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा तासांत पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या तीन प्रमुख नॅशनल चेनमध्ये तब्बल 30 हजार तिकिटांची विक्री झाली. या सुरुवातीच्या प्रतिसादाच्या आधारे ‘टॉक्सिक’ पहिल्याच दिवशी हिंदी भाषेतून 45 ते 50 कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नॅशनल चेनसोबतच नॉन-नॅशनल चेनमधील बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, दुपारी 3 वाजेपर्यंत देशभरात ‘टॉक्सिक’ची 84,315 तिकिटे बुक झाली होती. प्रदर्शनाला अजून काही दिवस बाकी असतानाच झालेल्या या बुकिंगमधून चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 4.1 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ब्लॉक सीट्सचा समावेश केल्यास हा आकडा 9.19 कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे येत्या दिवसांत ॲडव्हान्स बुकिंगला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
‘टॉक्सिक’मध्ये यश मुख्य भूमिकेत असून कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, नयनतारा, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी अशा एकूण सहा भाषांमध्ये ‘टॉक्सिक’ प्रदर्शित होणार आहे.
विशेष म्हणजे, तब्बल चार वर्षांनंतर यश मोठ्या पडद्यावर परतणार आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘KGF 2’नंतर यशचा कोणताही मोठा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही. त्यामुळे त्याच्या कमबॅकची चाहत्यांना मोठी प्रतीक्षा आहे. आता ॲडव्हान्स बुकिंगला मिळालेला हा प्रतिसाद चित्रपटाच्या प्रत्यक्ष प्रदर्शनानंतर किती मोठ्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये बदलतो, याकडे सिनेसृष्टीचे आणि प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.