गोंदिया जिल्ह्यात २१५ अपघातात १२४ जणांचा बळी

सात महिन्याची आकडेवारी: अतिवेग, मद्यपान, हेल्मेटचा अभाव ठरतोय जीवघेणा

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
गोंदिया,
gondia district जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे विस्तारत असले तरी रस्ते सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गुणवत्ताहीन रस्ते, अतिवेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन, मद्यपान करून वाहन चालविणे, हेल्मेटचा अभाव आणि विरुद्ध दिशेने वाहन चालविणे अशा विविध कारणांमुळे जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यांत जिल्ह्यात तब्बल २१५ अपघात झाले. या अपघातांत १२४ जणांचा मृत्यू, तर ११४ जण गंभीर आणि ४२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींपैकी अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.
 
 
gondia district
 
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून सातत्याने जनजागृती केली जाते. वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन, पत्रकांचे वाटप, रस्ता सुरक्षा सप्ताह तसेच विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. मात्र, या उपाययोजनांनंतरही नियमांकडे कानाडोळा करणार्‍या वाहनचालकांमुळे अपघातांची मालिका थांबताना दिसत नाही. अनेक अपघातांमागे वाहनावरील नियंत्रण सुटणे, अतिवेग, मद्यपान करून वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे तसेच वाहन चालविताना झोप अनावर होणे ही कारणे असल्याचे समोर येते. विशेषतः दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर न करण्याचे प्रकार जीवघेणे ठरत आहेत.
 
 
दुसरीकडे रस्त्यांची खराब अवस्था आणि अपूर्ण किंवा निकृष्ट कामेही अपघातांना निमंत्रण देत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेष म्हणजे, जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत घडलेल्या अपघातांकडे लक्ष दिल्यास मार्च महिन्यात सर्वाधिक ४० अपघात झाले आहे. त्यापाठोपाठ मे महिन्यात ३७, फेब्रुवारीत ३६, एप्रिलमध्ये ३२, जानेवारीत २८, जूनमध्ये २७ आणि जुलैमध्ये १५ अपघातांची नोंद झाली. अपघातांची संख्या जुलैमध्ये कमी झाली असली तरी प्रत्येक अपघातामागे एखाद्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याने केवळ आकडेवारीतील घट पुरेशी नसून अपघातमुक्त वाहतुकीसाठी कठोर अंमलबजावणीची गरज आहे.
सात महिन्यांत झालेले अपघात व मृत्यू
महिना अपघात मृत्यू
जानेवारी २८ १७
फेब्रुवारी ३६ २२
मार्च ४० २१
एप्रिल ३२ २०
मे ३७ १५
जून २७ १९
जुलै १५ १०
एकूण २१५ १२४
वाहतुकीच्या नियमांचे पालन करून खबरदारी घेतल्यास अपघातांवर नियंत्रण मिळविता येते. सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक विभागातर्फे सातत्याने जनजागृती करण्यात येते. वाहन नेहमी नियंत्रणात चालवावे, सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर करावा. पालकांनी अल्पवयीन पाल्यांना वाहन चालविण्यास देऊ नये.
 
- नागेश भास्कर
पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, गोंदिया