‘आश्रम ४’च्या शूटिंगला सुरुवात

जुनी फौजही मैदानात

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
मुंबई
aashram 4 आपल्या कपटी, रहस्यमय आणि अंगावर काटा आणणाऱ्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘बाबा निराला’ पुन्हा एकदा आपल्या काळ्या साम्राज्याचा दरबार भरवण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या गाजलेल्या ‘आश्रम’ या क्राईम-ड्रामा वेब सीरिजच्या चौथ्या पर्वाच्या चित्रीकरणाला अखेर अधिकृत सुरुवात झाली आहे. निर्मात्यांनी मुहूर्त पूजेचा फोटो आणि ‘आश्रम ४’ लिहिलेला क्लॅपरबोर्ड शेअर करत शूटिंग सुरू झाल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
 

aashram 4 shooting begins: bobby deol returns as baba nirala with old cast 
प्रकाश झा प्रोडक्शन्सने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून ‘आश्रम ४’च्या मुहूर्त पूजेचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये पूजेच्या ठिकाणी ‘आश्रम ४’ लिहिलेला क्लॅपरबोर्ड स्पष्टपणे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना निर्मात्यांनी, “एक और आरंभ… आश्रमच्या या नव्या अध्यायात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जपनाम… ‘आश्रम ४’चे शूटिंग सुरू!” असे कॅप्शन दिले आहे.
‘आश्रम ४’च्या शूटिंगची बातमी समोर येताच चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युझरने, “हा माझा आजवरचा सर्वात आवडता शो आहे, आता जास्त वाट पाहू शकत नाही!” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “आम्ही आजही जुने सीझन्स पुन्हा पुन्हा पाहतो, बाबा निरालाची दहशत पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहोत,” असे म्हटले.
चौथ्या सीझनमध्ये ‘आश्रम’ची जुनी तगडी aashram 4  फौज पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. बॉबी देओल पुन्हा ‘बाबा निराला’च्या मुख्य भूमिकेत दिसणार असून, चंदन रॉय सान्याल ‘भोपा स्वामी’च्या भूमिकेत त्याचा उजवा हात म्हणून परतणार आहे. आदिती पोहनकर ‘पम्मी पैलवान’च्या भूमिकेत बाबांच्या पाखंडाविरोधातील लढा पुढे नेताना दिसेल. याशिवाय दर्शन कुमार, अनुप्रिया गोएंका, ईशा गुप्ता, अध्ययन सुमन आणि त्रिधा चौधरी यांसारखे कलाकारही पुन्हा एकदा या सत्तेच्या खेळात आमनेसामने येणार आहेत. ‘आश्रम ४’चा चौथा सीझनही ‘एमएक्स प्लेअर’वर स्ट्रीम होण्याची दाट शक्यता आहे.स्वतःला देवाचा अवतार भासवून भोळ्याभाबड्या लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या आणि राजकारण्यांशी संधान बांधून गुन्हेगारीचे साम्राज्य चालवणाऱ्या ढोंगी बाबाची ही थरारक कथा आहे. मालिकेचा पहिला सीझन २८ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ११ नोव्हेंबर २०२० रोजी दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. तिसरा सीझन जून २०२२ मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडले.
दरम्यान, ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या तुफान यशानंतर बॉबी देओल सध्या आपल्या करिअरच्या सर्वोत्तम टप्प्यातून जात आहे. ‘आश्रम ४’व्यतिरिक्त त्याच्याकडे ‘जन नायकन’, ‘तीसवी मंजिल’, ‘देसी शेरलॉक होम्स’, ‘द हंटरसेंट’ आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा एक ॲक्शनपट असे एकापेक्षा एक बिग बजेट प्रोजेक्ट्स आहेत. त्यामुळे ‘बाबा निराला’च्या पुनरागमनासोबतच बॉबी देओलच्या आगामी प्रोजेक्ट्सकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे.