नवी दिल्ली,
Ajit Doval in Beijing tomorrow भारत आणि चीनमधील सीमावादावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची राजनैतिक बैठक होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल सोमवारी चीनची राजधानी बीजिंग येथे दाखल होणार असून, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत ते भारत-चीन सीमा प्रश्नावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होतील.या बैठकीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) परिस्थितीसह दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणात सैन्य आणि लष्करी साधनसामग्री तैनात केली होती.

गेल्या काही वर्षांत भारत आणि चीनमध्ये लष्करी तसेच राजनैतिक पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. LACवरील तणाव कमी करणे, सैन्य माघारीची प्रक्रिया पुढे नेणे आणि सीमावर्ती भागात शांतता व स्थिरता कायम ठेवणे हा या चर्चांचा प्रमुख उद्देश आहे.विशेष प्रतिनिधी यंत्रणा ही भारत-चीन सीमावादावर राजकीय तोडगा शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेले महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधी सीमाप्रश्नावर व्यापक आणि दीर्घकालीन तोडगा काढण्याच्या शक्यतांवर चर्चा करतात.
अजित डोवाल आणि वांग यी यांच्या बैठकीत LACवरील परिस्थिती, सीमा व्यवस्थापन, सैन्याची तैनाती, सीमावर्ती भागातील शांतता आणि भारत-चीन द्विपक्षीय संबंध हे प्रमुख मुद्दे राहण्याची शक्यता आहे. भारताने सीमेवर शांतता आणि स्थिरता ही दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्यासाठीची मूलभूत अट असल्याचे यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्यामुळे डोवाल यांचा चीन दौरा भारत-चीन संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. सीमावादाच्या तात्कालिक व्यवस्थापनासोबतच भविष्यातील राजकीय तोडग्यासाठीही या चर्चेतून मार्ग निघतो का, याकडे आता लक्ष लागले आहे.