मंगरूळनाथ,
chandrakant thakre आगामी काळात पाणी व चार्याची टंचाई गंभीर होण्याची शयता लक्षात घेता शेतकरी आणि पशुधनासाठी आवश्यक पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेतकर्यांची समृद्धी व खुशहालीसाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी केले. मंगरूळनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती, जिनिंग प्रेसिंग व खरेदी-विक्री संघाच्या वार्षिक आमसभेचे आयोजन २२ ऑगस्ट रोजी बाजार समितीच्या प्रांगणात करण्यात आले.

यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे होते तर यावेळी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष भाई देवराव फुके, पुणे बाजार समितीचे संचालक विठ्ठल गावंडे,राम ठाकरे, महादेव सुर्वे, संजय देशमुख, शालिग्राम बारड, सतीश बाहेती,राजेश ढोले,रमेश नावंदर, रमेश शिंदे, मुसा पटेल, ओम बंग, राजकुमार गावंडे यांच्यासह पदाधिकारी,संचालक, शेतकरी व मान्यवर उपस्थित होते. बाजार समितीच्या माध्यमातून काम करताना छोट्यातील छोट्या घटकालाही न्याय व मदत मिळावी, ही भूमिका कायम राहिली आहे. भविष्यातही शेतकर्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचे प्रयत्न सुरूच राहतील, अशी ग्वाही सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य व अधिक भाव मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शेतकरी प्रतिनिधी, व्यापारी आणि संस्थांच्या सहकार्याने शेतकर्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देणे आवश्यक आहे. बाजार समितीच्या कार्याचे कौतुक करून भविष्यात आणखी प्रभावी उपक्रम राबवावेत, असे आवाहन सुभाष ठाकरे यांनी केले.
उल्लेखनीय शेती कार्याबद्दल वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार प्राप्त बाजार समितीचे संचालक केशव भगत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुरस्कारप्राप्त गोदमले, मोहिते यांच्यासह कृषी व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी पुरस्कारप्राप्त शेतकर्यांचे अभिनंदन केले. परिसरात मुबलक पाऊस पडून शेतकरी सुखी व समृद्ध व्हावेत, अशी सदिच्छा सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास शिवा सहकारी सोसायटीचे सदस्य, बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक, शेतकरी तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.