मॅके,
australias victory ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ५१ धावांनी दणदणीत विजय मिळवत सामना अवघ्या दोन दिवसांत संपवला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ मधील स्थान अधिक मजबूत झाले असून, बांगलादेशच्या विजयाच्या टक्केवारीला मोठा फटका बसला आहे.
मॅके येथे झालेल्या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव केवळ ६४ धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने २१० धावा करत १४६ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही आणि अवघ्या ९५ धावांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने संपूर्ण सामन्यात १० बळी घेतले.
या पराभवानंतर बांगलादेश WTC गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम असला, तरी त्याच्या विजयाच्या टक्केवारीत मोठी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर बांगलादेशची विजयाची टक्केवारी ६६.६७ होती. दुसरी कसोटी गमावल्यानंतर ती आता ५५.५६ टक्क्यांवर आली आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचे गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम आहे. सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ७७.७८ होती. बांगलादेशविरुद्धच्या विजयामुळे ती आता ८० टक्क्यांवर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाने या WTC चक्रात आतापर्यंत १० कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी आठ सामने जिंकले आणि दोन गमावले आहेत.
बांगलादेशच्या पराभवामुळे भारतीय संघासाठीही गुणतालिकेत वर जाण्याची संधी निर्माण झाली आहे. भारत सध्या श्रीलंकेविरुद्ध दुसरी कसोटी खेळत आहे. भारताने हा सामना जिंकल्यास तो बांगलादेशला मागे टाकून चौथ्या स्थानावर पोहोचू शकतो. भारताने दुसरी कसोटी जिंकून मालिका २-० अशी खिशात घातल्यास त्याची विजयाची टक्केवारी ५७.५८ होईल.
WTC गुणतालिकेत विद्यमान विजेता दक्षिण आफ्रिका ७५.०० टक्के विजयाच्या सरासरीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेने चारपैकी तीन कसोटी सामने जिंकले असून एका सामन्यात पराभव पत्करला आहे. भारत ५३.३३ टक्के विजयाच्या सरासरीसह सध्या पाचव्या स्थानावर आहे. भारताने या WTC चक्रात १० पैकी पाच सामने जिंकले, चार गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. गॉल येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने श्रीलंकेचा १६५ धावांनी पराभव करत आपल्या विजयाची टक्केवारी सुधारली होती.