‘लाईक्स म्हणजे पात्रता नव्हे!’ अवधूत गुप्तेंचा नव्या पिढीला सल्ला

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
मुंबई
avdhoot gupte मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि परीक्षक अवधूत गुप्ते पुन्हा एकदा ‘सारेगमप’च्या मंचावर परीक्षकाच्या भूमिकेत परतले आहेत. अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वात नव्या पिढीचे नवे आवाज, संगीताकडे पाहण्याची त्यांची बदललेली दृष्टी आणि सोशल मीडियामुळे बदलत चाललेलं संगीतविश्व पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने अवधूत गुप्ते यांनी नव्या पिढीचं संगीत, सोशल मीडियाचा प्रभाव, स्पर्धकांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या संगीतप्रवासाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.
 

avdhoot gupte returns to saregamapa: shares views on new generation singers and social media 
अनेक नवोदित गायकांचा प्रवास जवळून पाहिलेल्या अवधूत गुप्ते यांना आजच्या स्पर्धकांमध्ये नेमका कोणता वेगळेपणा जाणवतो, याबाबत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यांच्या मते, अनेक वर्षांचा अनुभव असला तरी गाण्यासाठी आवश्यक असलेले संगीताचे सात सूर आणि ताल कधीच बदलत नाहीत; मात्र त्यामागचा भाव सतत बदलत असतो आणि हा बदलणारा भाव त्या-त्या काळातील समाजाचं प्रतिबिंब दाखवतो. आजची पिढी आधीच्या पिढीपेक्षा खूप वेगळी असून ती स्पष्ट मतांची आणि स्पष्टवक्ती आहे. ज्याला नमस्कार करावासा वाटतो, त्यालाच ही पिढी नमस्कार करते. समोरच्या व्यक्तीच्या पात्रतेप्रमाणे वागण्याचा आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करण्याचा कल या पिढीत असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘सारेगमप’ची संपूर्ण टीम केवळ शिक्षण देण्यापेक्षा संस्कार देण्यावर अधिक भर देते, असंही अवधूत यांनी स्पष्ट केलं. आज इंटरनेटच्या माध्यमातून राग, यमन यांसारख्या संगीताच्या विविध अंगांची माहिती सहज उपलब्ध आहे. एका युट्युब सर्चवरही अनेक जण मोफत शिकवताना दिसतात. त्यामुळे परीक्षक म्हणून केवळ गाण्याचं शिक्षण देणं हे आपलं काम नसून स्पर्धकांना संगीताचे संस्कार देणं अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं.
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाबाबतही अवधूत गुप्ते यांनी स्पष्ट भूमिका मांडली. एखाद्या चांगल्या गायकाने उत्तम कलाकृती सादर करून ती सोशल मीडियावर शेअर केली आणि त्याला अपेक्षेप्रमाणे लाईक्स मिळाले नाहीत, तर त्यावरून स्वतःची पात्रता ठरवणं चुकीचं आहे, असं ते म्हणाले. एखादा गायक सर्वोत्कृष्ट असू शकतो आणि त्याला केवळ योग्य प्रोत्साहनाची गरज असू शकते. त्यामुळे सोशल मीडिया हा गायकाच्या गुणवत्तेचा निकष नाही, हे त्याला समजावून सांगणं गरजेचं असल्याचं अवधूत यांनी सांगितलं.
याउलट, विविध गिमिक्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर लोकप्रिय होणाऱ्या एखाद्या गायकाला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत असले, तरी तो उत्तम गायक नसेल तर ‘सारेगमप’च्या मंचावर त्याची खरी गुणवत्ता समोर येईल. सोशल मीडिया आणि ‘सारेगमप’च्या मंचामधील हाच मोठा फरक असल्याचं अवधूत यांनी स्पष्ट केलं. या मंचावर गायकाच्या गायनात असलेलं खरं ‘सोनं’ समोर आणून दाखवावं लागतं, असं त्यांनी सांगितलं.
परीक्षक म्हणून आपले निकष कधीच बदलणार नसल्याचंही अवधूत यांनी स्पष्ट केलं. सूर आणि ताल, काव्याची जाण, शब्दांचा अर्थ समजून घेऊन त्यातून निर्माण होणारी भावुकता या गोष्टी त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यासोबतच गाणं सादर करताना गायकाचं प्रेझेंटेशनही तितकंच महत्त्वाचं आहे. गायकाने गाण्याचे भाव केवळ स्वतः अनुभवणे पुरेसे नसून ते समोरच्या व्यक्तीलाही जाणवले पाहिजेत, असं त्यांनी सांगितलं.
या पर्वात परीक्षक म्हणून जुन्या आणि नव्या संगीताचा मिलाप करण्याचा प्रयत्न असल्याचं अवधूत यांनी सांगितलं. स्पर्धकांचं खरं संगीत आणि खरं टॅलेंट प्रेक्षकांसमोर आणणं, गुणवंतांना प्रोत्साहन देणं हे परीक्षकांचं काम आहेच; मात्र आजच्या पिढीला नव्या माध्यमांसमोर जाण्यासाठी तयार करणं हीदेखील परीक्षकांची जबाबदारी असल्याचं त्यांचं मत आहे. त्यामुळे या सीझनमध्ये सोशल मीडिया किंवा इतर नव्या माध्यमांवर स्पर्धकांनी आपलं संगीत योग्य पद्धतीने कसं मांडावं, याबाबतही मार्गदर्शन करण्यावर त्यांचा भर असणार आहे.
स्पर्धकांना भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देताना अवधूत यांनी त्यांना एक महत्त्वाचा सल्लाही दिला. “वक्त से पहले और नसीब से ज्यादा किसी को नहीं मिलता,” ही म्हण कायम लक्षात ठेवावी, असं त्यांनी सांगितलं. मोठा गायक व्हायचं, खूप उंची गाठायची, भरपूर पैसा आणि प्रसिद्धी मिळवायची, असं ठरवून प्रवास करण्यापेक्षा आपण काल जिथे होतो त्यापेक्षा आज एक पाऊल पुढे जात आहोत का, याचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
संगीताची आवड असलेल्या तरुणांनीही या स्पर्धकांकडून प्रेरणा घ्यावी, असं अवधूत म्हणाले. रियाज केला, गाणं शिकलं आणि आपल्या गायनावर सातत्याने काम केलं, तर एक दिवस मोठ्या मंचावर गायक म्हणून पोहोचता येऊ शकतं आणि स्वतःचं करिअर घडवता येऊ शकतं. संगीत क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ‘सारेगमप’सारखा मंच हा एक चांगला राजमार्ग उपलब्ध करून देत असल्याचं त्यांनी नमूद केलं.यासोबतच मराठी भाषा पुढे जात असल्याची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपापलं कार्य सुरू ठेवावं आणि नव्या पिढीवर चांगले संस्कार करण्याचं काम सकारात्मकतेने व विश्वासाने सुरू ठेवावं, अशी अपेक्षाही अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केली. संगीताच्या स्पर्धेच्या पलीकडे जाऊन नव्या पिढीला घडवणं आणि तिच्या कलागुणांना योग्य दिशा देणं, हाच ‘सारेगमप’च्या या नव्या पर्वाचा महत्त्वाचा प्रयत्न असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं.