गर्दीपासून दूर निसर्गाच्या कुशीत! 'ही’ ५ ठिकाणे ठरतील परफेक्ट

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
these 5 places are perfect choices उत्तराखंड म्हटले की डोळ्यांसमोर उभे राहतात ते हिरवेगार डोंगर, धबधबे, ढगांनी वेढलेली शिखरे आणि शांत वातावरण. वर्षभर पर्यटकांची वर्दळ असली तरी पावसाळ्यानंतर काही ठिकाणी तुलनेने कमी गर्दीत निसर्गाचा आनंद घेता येतो. ऑगस्टनंतर उत्तराखंडमध्ये फिरण्याचा विचार करत असाल, तर फुलांनी बहरलेली दरी, शांत हिल स्टेशन आणि नदीकाठची निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकतात.
 
 
these 5 places are perfect choices
चमोली जिल्ह्यातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणजेच फुलांची दरी हे त्यापैकी एक खास ठिकाण आहे. जागतिक वारसा स्थळ असलेली ही दरी ८७.५ चौरस किलोमीटर परिसरात पसरलेली आहे. जुलै ते सप्टेंबरदरम्यान येथे विविध रंगांची फुले आणि हिरवळ पाहायला मिळते. या काळात दरीचे रूप दर काही दिवसांनी बदलत असल्याचे दिसून येते. येथे ५०० हून अधिक प्रकारची फुले आढळतात. हिमालयीन थार, कस्तुरी हरीण, हिमबिबट्या यांसारखे वन्यजीवही परिसरात आढळतात. दरीत सकाळी प्रवेश करून सायंकाळी ५ वाजेपर्यंत परतणे अनिवार्य आहे. हे ठिकाण दरवर्षी १ जूनला पर्यटकांसाठी खुले होते आणि ३१ ऑक्टोबरला बंद होते. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरून ज्योतिर्मठ, गोविंदघाट आणि घांगरिया बेस कॅम्पमार्गे येथे पोहोचता येते.
 
पौरी जिल्ह्यातील लॅन्सडाउन हे शांत वातावरणासाठी ओळखले जाणारे आणखी एक सुंदर ठिकाण आहे. ‘पर्वतांचा राजकुमार’ अशी ओळख असलेल्या या हिल स्टेशनचे अंतर दिल्लीपासून सुमारे २८० किलोमीटर आहे. भुल्ला तलाव, दरबार सिंग संग्रहालय, टिप-इन-टॉप चर्च, संतोषी माता मंदिर, दुर्गा मंदिर, कालेश्वर महादेव, राठी पॉइंट, ताडकेश्वर महादेव आणि मॉल रोड यांसारखी ठिकाणे येथे पाहता येतात. दिल्लीहून कोटद्वारमार्गे लॅन्सडाउनला जाता येते.

these 5 places are perfect choices 
 
पावसाळ्यात ऋषिकेशचे निसर्गरूपही अधिक खुलते. तुलनेने शांत ठिकाणांचा अनुभव घ्यायचा असल्यास बीटल्स आश्रम अर्थात चौरासी कुटिया, वशिष्ठ लेणी, भूतनाथ मंदिर आणि नीलकंठ मार्गाकडे जाता येते. गंगेच्या काठावरील मरीन ड्राईव्ह अर्थात आस्था पथावर फेरफटका मारण्याचा अनुभवही वेगळा ठरतो. पावसाळ्यात गंगेचे घाट अधिक आकर्षक दिसतात आणि संध्याकाळची गंगा आरतीही पर्यटकांना अनुभवता येते. क्यार्की व्ह्यू पॉइंटवरून ऋषिकेश शहराचे विहंगम दृश्य पाहता येते. ऋषिकेशला बस, टॅक्सी किंवा रेल्वेने पोहोचता येते.
 
देहरादूनमधील रायपूर परिसरातील मालदेवता हे सोंग नदीच्या काठावर वसलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. हिरवे डोंगर, धबधबे आणि नदीचा खळखळाट यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना शांत वातावरणाचा अनुभव मिळतो. पावसाळ्यात परिसर अधिक हिरवागार होतो आणि ढगांनी झाकलेले डोंगर या ठिकाणच्या सौंदर्यात भर घालतात. दिल्लीहून देहरादूनमार्गे मालदेवता गाठता येते.
 
नैनिताल जिल्ह्यातील भवाली हेही शांत आणि आल्हाददायक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. पाइनच्या जंगलांनी वेढलेल्या या थंड हवेच्या ठिकाणी श्यामखेत चहा मळा हे प्रमुख आकर्षण आहे. प्रसिद्ध कैंची धामही भवालीजवळ आहे. मैदानी भागातील उष्णता आणि गर्दीपासून काही काळ दूर जाण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला पसंती देतात. दिल्लीहून हल्द्वानीमार्गे भवालीला पोहोचता येते.
 
मात्र, उत्तराखंडच्या डोंगराळ भागात प्रवास करताना हवामानाचा अंदाज तपासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. पावसात वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी आणि भूस्खलनाच्या घटनांबाबतची माहिती लक्षात ठेवावी. प्रवासात छत्री, रेनकोट आणि मजबूत बूट सोबत ठेवणेही उपयुक्त ठरते.