अनिल कांबळे
नागपूर,
bail granted डागा रुग्णालयातून नवजात बाळ चोरी करुन घरी नेणाऱ्या आशिया अंजुमला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. मातृत्व हिरावल्याच्या दुहेरी धक्क्याने मानसिकदृष्ट्या खचलेली आशिया अंजूमला न्यायालयात ढसाढसा रडत होती. ‘माझे बाळ मला परत द्या’, असे म्हणत ती वारंवार आक्रोश करीत होती. तिची मानसिक अवस्था लक्षात घेऊन न्यायालयाने मानवी दृष्टिकोनातून तिला जामीन मंजूर केला.

यशोधरानगर येथे माहेर असलेल्या आणि छत्रपती संभाजीनगर येथे सासर असलेल्या अंजूमचे पहिले बाळ जन्मानंतर काही महिन्यांतच दगावले होते तर दुसऱ्यांदा प्रसुत झाल्यानंतर तिचे बाळ चोवीस तासांत दगावले. सलग दोन अपत्ये गमावल्याने अंजूम गंभीर मानसिक तणावात आणि नैराश्यात गेली होती. शुक्रवारी डागा रुग्णालयाबाहेर इतर मातांना त्यांच्या मुलांसोबत पाहिल्यानंतर तिची ममता जागी झाली. तिने प्रभा पाठराबे यांच्या नवजात बाळाला उचलून नेले. घटनेनंतर तिच्या भावाने बाळाला पोलिसांच्या ताब्यात दिले आणि अंजूमला पकडण्यात आल्याची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर अंजूमने चालत्या ई रिक्षातून उडी घेतली. यात ती जखमी झाली. त्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात तिची मानसिक अवस्था पाहून जामीन मंजूर केला.
ठाणेदाराने केले समूपदेशन
जामीन मिळाल्यानंतर सुरुवातीला तिच्या नातेवाइकांनी तिला सोबत घेऊन जाण्यास नकार दिला. यानंतर तहसील पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांनी नातेवाइकांचे समुपदेशन केले. अंजूमवर उपचार आणि कुटुंबाचा आधार आवश्यक असल्याचे पोलिसांनी समजावून सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी तिला सोबत नेले. दरम्यान, चोरीला गेलेले नवजात बाळ सुखरूप आईकडे पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऑटोचालक, पोलिस पथक आणि अंजूमच्या भावाचे कौतुक होत आहे.