मुंबई,
bhuleshwar-raja-idol-loses-balance-arrival-procession मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीला २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी गालबोट लागले. भायखळ्याहून भुलेश्वरच्या दिशेने निघालेल्या मिरवणुकीदरम्यान गणेशमूर्तीचा अचानक तोल गेल्याने मोठी दुर्घटना घडली. मूर्तीखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ५ आणि ७ वर्षांच्या दोन मुलींचाही समावेश आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.भुलेश्वर परिसरात गणरायाच्या आगमनाचा सोहळा मोठ्या उत्साहात सुरू होता. अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपापासून अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावर मूर्ती पोहोचली होती. त्याचवेळी अचानक मूर्ती हलू लागली आणि काही क्षणांतच तिचा तोल गेला. या दुर्घटनेनंतर मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला.
या घटनेत संकेत नेवशे (३३) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (३०) यांचा मृत्यू झाला. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुर्घटनेत आणखी पाच जण जखमी झाले असून त्यात दोन लहान मुलींचा समावेश आहे.दरम्यान, मूर्तीचा तोल नेमका कशामुळे गेला, याबाबत स्थानिक नागरिकांनी विविध कारणे सांगितली आहेत. मिरवणुकीदरम्यान सुरुवातीला गणपतीच्या गळ्यातील हार खाली पडला आणि त्यानंतर मूर्ती हलू लागल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रस्त्यावरील खड्ड्यामुळे ट्रॉलीचे चाक त्यात अडकल्याने अचानक झटका बसला आणि त्यातून मूर्तीचा तोल गेल्याची माहिती नागरिकांनी दिली. गणेशमूर्तीच्या आगमनाचा आनंद सुरू असतानाच घडलेल्या या दुर्घटनेने भुलेश्वर परिसरात शोककळा पसरली. दुर्घटनेचे नेमके कारण आणि त्यामागील जबाबदारी तपासातून स्पष्ट होणार आहे.