‘आमच्यावर हल्ला झाला’

ट्रम्प यांच्या शुल्काला कॅनडाचे प्रत्युत्तर

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
ओटावा,
Canada's response to Trump's tariffs अमेरिका आणि कॅनडामधील व्यापारविषयक चर्चा निष्फळ ठरल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेच्या नव्या व्यापार अटी मान्य नसल्याचे स्पष्ट करत कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेवर प्रतिशोधात्मक शुल्क लावण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेने लादलेल्या अटी कॅनडासाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक आणि अन्यायकारक असल्याचा दावा कार्नी यांनी केला. वॉशिंग्टनसोबतच्या चर्चेतून माघार घेतल्यानंतर कार्नी यांनी अमेरिकेच्या धोरणावर जोरदार टीका केली. “जेव्हा तुमच्यावर हल्ला होतो, तेव्हा तुम्ही युद्धाच्या स्थितीत असता. आमच्यावर हल्ला झाला आहे,” असे म्हणत त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर व्यापारयुद्ध सुरू केल्याचा आरोप केला. अमेरिकेने सुचवलेल्या अटी कॅनडाच्या हिताच्या नसल्याने त्या स्वीकारल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
Canada
 
शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने अमेरिकेने कॅनडातून आयात होणाऱ्या सुमारे २० अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंवर ५० टक्के नवीन शुल्क लागू केले आहे. हॉकी स्टिकपासून सिमेंटपर्यंत विविध उत्पादनांचा त्यात समावेश आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी कार्नी यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधांचा उल्लेख करत दोन्ही देशांमध्ये व्यापार करार होण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, कॅनडाच्या पंतप्रधानांच्या मते अमेरिकेच्या अटी अखेरीस मान्य करण्याजोग्या राहिल्या नाहीत. अमेरिकेच्या नव्या शुल्काला समान पद्धतीने प्रत्युत्तर देण्याची तयारी कॅनडाने दर्शवली आहे. कार्नी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये कॅनडातील कामगार, शेतकरी, कुटुंबे आणि उद्योगांचे हित जपण्यासाठी अमेरिकेच्या शुल्काला डॉलर-टू-डॉलर आधारावर उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे.कॅनडाकडून लावण्यात येणारे नवीन शुल्क प्रामुख्याने अमेरिकेच्या पोलाद आणि दुग्ध उद्योगांना लक्ष्य करणार असून, हे शुल्क ८ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. या निर्णयाबाबत अधिक माहिती पुढील आठवड्यात जाहीर केली जाईल, असे कार्नी यांनी सांगितले.
 
दरम्यान, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेम्सन ग्रीर यांनी कॅनडासोबतच्या चर्चेबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. कॅनडाकडून काही सवलती मिळाल्यास पोलाद, ॲल्युमिनियम, ऑटोमोबाईल्स आणि लाकूड यांच्यावरील शुल्कात मोठी कपात करण्याचा प्रस्ताव अमेरिकेने दिल्याचे त्यांनी शुक्रवारी सांगितले.दुसरीकडे, कॅनडा ट्रम्प प्रशासनाने ऑटोमोबाईल्स, पोलाद आणि ॲल्युमिनियमवर लावलेल्या शुल्कातून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या शुल्कांचा कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून रोजगारावरही त्याचा फटका बसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचवेळी व्हाइट हाऊसने कॅनडावर अमेरिकन वाईन, मोटारगाड्या आणि दुग्धजन्य पदार्थांबाबत भेदभावपूर्ण धोरण अवलंबल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आणखी तणावपूर्ण होण्याची चिन्हे आहेत.