मुंबई,
ceremony of the king of Bhuleshwar मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. सुमारे २२ फूट उंचीची गणेशमूर्ती अचानक कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह पाच जण जखमी झाले. मूर्तीच्या संरचनेतील बोल्ट निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास जय आंबे चौकातील कबुतरखान्याजवळ बलराम मर्चंट रोड परिसरात हा प्रकार घडला. भुलेश्वरच्या राजाच्या गणेशमूर्तीच्या आगमन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविक उपस्थित होते. याचवेळी मूर्ती कोसळल्याने उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि काही जण मूर्तीखाली दबून जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा तसेच महापालिकेच्या संबंधित विभागातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सुरुवातीला एका व्यक्तीला जी.टी. रुग्णालयात मृतावस्थेत आणण्यात आले होते. त्यानंतर उपचारादरम्यान आणखी एका गंभीर जखमीचा मृत्यू झाला. प्रशासनाने अखेर या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू आणि पाच जण जखमी झाल्याची पुष्टी केली.मृतांमध्ये संकेत नेवशे (३३) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (३०) यांचा समावेश आहे. जखमींची नावे वैभव घेनांद (३८), पवन चौरसिया (२५), लावण्या गणेर (५), दिव्या गणेर (७) आणि कुणाल काशिद (२६) अशी आहेत. सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवसांच्या या उत्सवात विविध मंडळांकडून गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये दरवर्षी मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, भुलेश्वर येथे आगमन सोहळ्यादरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमुळे उत्सवाच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले.