बहिणींच्या नावे जमीन, घरात वाद अन् अखेर चांदगुडे कुटुंब उद्ध्वस्त!

तपासात समोर आली नवी माहिती

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर,
Chandgude family devastated खवड्या डोंगर परिसरात आई, वडील आणि १९ वर्षीय कुणाल चांदगुडे यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना कुटुंबातील वादाची नवी बाजू समोर येत आहे. सुरुवातीला कुणालच्या आयफोनच्या हट्टामुळे ही घटना घडल्याची चर्चा होती. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात कौटुंबिक कलह आणि आर्थिक वादाच्या दिशेने तपास सुरू असल्याचे समोर आले आहे. तिघांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर मुरलीधर चांदगुडे यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पिंपळगाव येथे नेऊन अंत्यसंस्कार केले. तर संगीता आणि कुणाल यांच्यावर मुकुंदवाडी येथील संगीता यांच्या माहेरी अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार न झाल्याने कुटुंबातील अंतर्गत दुराव्याची चर्चा सुरू झाली.
 
 
Chandgude family devastated
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुरलीधर यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या नावावर असलेल्या काही जमिनीचा हिस्सा त्यांच्या तीन मुलींच्या, म्हणजेच कुणालच्या आत्यांच्या नावावर केला होता. या जमिनीच्या हस्तांतरणावरून मुरलीधर आणि संगीता यांच्यात सातत्याने मतभेद होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संगीता आणि कुणाल मूळ गावी जाणे टाळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या संगीता यांच्या ‘संगीता चांदगुडे’ या यूट्यूब चॅनेलवर २८ हजार सबस्क्रायबर्स असून त्यांनी १६७ व्हिडीओ अपलोड केले होते. काही जुन्या व्हिडीओंमध्ये त्यांनी नातेवाईकांकडून संपत्ती आणि पैशांच्या कारणावरून त्रास होत असल्याचे आरोप केले होते. मुरलीधर ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक असल्याने ते अनेकदा १५ दिवस ते महिनाभर घराबाहेर असायचे. घरातील सततचे वाद आणि वडिलांबाबतची नाराजी यामुळे कुणाल मानसिक तणावात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात कौटुंबिक तणाव, आर्थिक वाद आणि इतर सर्व बाबींचा छत्रपती संभाजीनगर पोलीस सखोल तपास करत आहेत.