एका क्लिकवर मिळणार गणेशमूर्ती
नागपूर,
clay bappa gets a digital platform पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघाच्या वतीने ‘माझा बाप्पा मातीचा’ हे अभिनव डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलचे लोकार्पण मनपा स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानी दाणी यांच्या हस्ते करण्यात आले. नागपूरसह संपूर्ण विदर्भातील मातीच्या मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकार तसेच मातीच्या मूर्ती विक्रेत्यांना या डिजिटल उपक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींच्या निर्मिती व विक्रीला सध्या काही प्रमाणात परवानगी असली, तरी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पीओपी मूर्तींच्या विसर्जनावर निर्बंध आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्तींकडे नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र, बाजारपेठेत पीओपी मूर्तींची दुकाने मोठ्या प्रमाणावर असल्याने मातीच्या मूर्तींची दुकाने व कार्यशाळा शोधणे गणेशभक्तांसाठी अनेकदा अडचणीचे ठरते. ही अडचण दूर करण्यासाठी संघाने आपल्या संकेतस्थळावर ‘माझा बाप्पा मातीचा’ या नावाने स्वतंत्र डिजिटल पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.
या पोर्टलवर संघटनेचे मातीपासून मूर्ती बनविणारे अधिकृत मूर्तिकार व विक्रेत्यांची माहिती, मूर्तींचे प्रकार, छायाचित्रे, व्हिडीओ, संपर्क क्रमांक तसेच दुकान व कार्यशाळेचे गुगल मॅप लोकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरातील मातीच्या मूर्ती विक्रेते किंवा मूर्तिकारांची माहिती घरबसल्या एका क्लिकवर मिळणार आहे. विशेष म्हणजे हे व्यासपीठ समाज माध्यमांशीही जोडण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहक आणि मूर्तिकार यांच्यात थेट संपर्क व संवादाचे सातत्य राहण्यास मदत होणार आहे.
चौकट
‘मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्या’
आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी नागरिकांनी मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन शिवानी दाणी यांनी यावेळी केले. नागरिकांना त्यांच्या परिसरातच मातीच्या मूर्ती उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने संघाने सुरू केलेला ‘माझा बाप्पा मातीचा’ उपक्रम उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले. पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाठक यांनी मातीपासून मूर्ती बनविणारे मूर्तिकार व विक्रेत्यांनी या डिजिटल व्यासपीठावर आपली सदस्यता नोंदवून सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी चंदनलाल प्रजापती, महेश ठाकरे, राजाभाऊ रेवडकर, गजानन बुरबादे, प्रभाकर वालदे, गोविंदा कपाट, प्रवीण गाते, जानबा कपाट, मनोज वरवाडे, गणेश वालदे, धनराज वझे यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.