पोलिसांवरच मिरची पावडर फेकून मारहाण, 3 अधिकारी जखमी

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
दिल्ली
delhi bhalswa dairy police दिल्लीतील भलस्वा डेअरी परिसरातून पोलिसांनाच हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. नियमित गस्त आणि तपासणीसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या पथकावर संतप्त जमावाने अचानक हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात जमावाने पोलिसांवर मिरची पावडर फेकण्यासोबतच वीट आणि लाठ्यांनी मारहाण केली. या घटनेत तीन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलीस अधिकारी परिसरात नियमित गस्त घालत होते. यावेळी तपासणीदरम्यान एका वाहनावर कारवाई करून ते जप्त करण्यात आले. त्यानंतर वाहनमालकासह काही जणांच्या समूहाने पोलिसांवर हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे.
 

delhi bhalswa dairy police attacked by mob, 3 cops injured during vehicle checking 
या हल्ल्यात मिरची पावडर फेकून पोलिसांना लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर काही जणांनी लाठी-डंडे आणि वीट घेऊन पोलिसांवर हल्ला केला. या घटनेत तीन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी परिसरातील कुख्यात गुन्हेगार सुनील उर्फ पंकज याच्यावर मुख्य हल्लेखोर असल्याचा आरोप केला आहे. पंकज याच्याविरोधात यापूर्वी गंभीर गुन्ह्यांसह पाच प्रकरणे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर इतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके सातत्याने प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये काही व्यक्ती हातात लाठी-डंडे घेऊन पोलीस पथकावर हल्ला करताना स्पष्टपणे दिसत आहेत. नियमित गस्तीवर असलेल्या पोलिसांवरच अशा प्रकारे जमावाने केलेल्या हल्ल्यामुळे भलस्वा डेअरी परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.