दिल्ली
swine flu alert राजधानी दिल्लीमध्ये H1N1 म्हणजेच स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने नागरिकांसाठी आरोग्य मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि फ्लूसदृश लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ताज्या सरकारी आकडेवारीनुसार, 2026 मध्ये आतापर्यंत दिल्लीत 2,392 इन्फ्लूएंझा-एचे रुग्ण आढळले असून त्यापैकी 1,777 रुग्ण H1N1 बाधित आहेत.
गुरुवारी एकाच दिवसात H1N1चे 114 नवे रुग्ण आढळल्याने परिस्थितीचे गांभीर्य आणखी वाढले आहे. दिल्लीमध्ये इन्फ्लूएंझाच्या परिस्थितीवर दररोज लक्ष ठेवले जात असून, इन्फ्लूएंझासदृश आजार (ILI), गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) आणि इन्फ्लूएंझाच्या रुग्णांची नियमित नोंद केली जात आहे. आरोग्य विभागाने रुग्णालयांमध्ये आवश्यक खाटा, डॉक्टर, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंड रुमालाने झाकण्याचा सल्ला दिला आहे. साबण आणि पाण्याने वारंवार हात स्वच्छ धुवावेत, संसर्ग झालेल्या व्यक्तींपासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि अनावश्यकपणे डोळे, नाक किंवा तोंडाला हात लावणे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये तसेच शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्यास आणि श्वसनाशी संबंधित आजाराची लक्षणे दिसत असल्यास अनावश्यक गर्दी टाळण्यासही सांगण्यात आले आहे.ताप, खोकला, घसा दुखणे किंवा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास स्वतःहून औषधे घेऊ नयेत. अशा वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आधीपासून काही आजार असलेल्या किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इन्फ्लूएंझा किंवा फ्लू हा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य आजार असून त्याचा परिणाम नाक, घसा आणि श्वसनमार्गावर होतो. H1N1 हा इन्फ्लूएंझा-एचा एक प्रकार असून त्याला सामान्यतः ‘स्वाईन फ्ल्यू’ म्हणून ओळखले जाते. संक्रमित व्यक्ती खोकताना, शिंकताना किंवा बोलताना बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म थेंबांमधून हा विषाणू पसरू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, भारतात इन्फ्लूएंझाचा प्रभाव साधारणपणे वर्षातील काही विशिष्ट काळात वाढताना दिसतो. यंदा दिल्लीत H1N1चा प्रसार अधिक प्रमाणात दिसून येत असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी दिल्लीचे आरोग्यमंत्री पंकज कुमार सिंह यांच्यासोबत परिस्थिती आणि आरोग्य व्यवस्थेच्या तयारीचा आढावा घेतला आहे.
आरोग्य विभागाकडून परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवली जात असून नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, स्वच्छता राखावी आणि लक्षणे जाणवल्यास वेळ न दवडता वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.