अवघ्या सात महिन्यात उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाची झेप

७२० मोजण्या, ४९८ फेरफार निकाली

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
५८ अतिक्रमित शिव पांदण रस्त्यांची मोजणी पूर्ण
 
सेलू,
deputy superintendent of land records office प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा, नागरिकांना वेळेत सेवा आणि कार्यालयीन शिस्त यांचा प्रभावी समन्वय साधत सेलू येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने अवघ्या सात महिन्यात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. १ जानेवारी ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत मोजणी, फेरफार, स्वामित्व योजना, महसूल अभियान, तक्रार निवारण तसेच सामाजिक बांधिलकी या सर्वच क्षेत्रांत लक्षणीय प्रगती झाल्याने विभागाच्या कार्यक्षमतेची जिल्हाभरात दखल घेतली जात आहे.
 
 
selu
 
या कालावधीत कार्यालयाकडे प्राप्त ८९० मोजणी पैकी ७२० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच ५७८ फेरफार प्रकरणांपैकी ४९८ प्रकरणे मंजूर करून निकाली काढण्यात आली. मोजणीसंदर्भातील तक्रारी व अर्ज दुरुस्तीच्या १० प्रकरणांची चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यात आला. नगर भूमापन कार्यालयाशी संबंधित १७ प्रकरणांवर सुनावणी घेऊन आदेश पारित करण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या २० ते २५ वर्षांपासून अतिक्रमणाखाली असलेल्या ५८ शिव पांदण रस्त्यांची मोजणी पूर्ण करून अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नाला मार्गी लावण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले.
 
स्वामित्व योजनेअंतर्गत विविध गावांमध्ये सनद वितरण शिबिरे घेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानासह शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्यात आला. नागरिकांच्या मोजणी, सीमावाद आणि फेरफारविषयक तक्रारींवर तत्काळ कारवाई करत कार्यालय परिसरात स्वच्छता, सुशोभीकरण आणि सुसंवादावरही भर देण्यात आला. या कामगिरीच्या जोरावर जुलै अखेर नागपूर विभागात वर्धा जिल्ह्याने ११०० पैकी ९५० मोजणी प्रकरणे निकाली काढून दुसरा क्रमांक मिळविला असून, सेलू तालुक्यानेही जिल्ह्यात द्वितीय स्थान पटकावले आहे.
भूमी अभिलेख विभाग हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट निगडित आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरण वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने निकाली काढण्याला आमचे प्राधान्य आहे. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ही कामगिरी शक्य झाली. आगामी काळात प्रलंबित प्रकरणांची संख्या आणखी कमी करून नागरिकांना अधिक जलद, दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी भूमी अभिलेख विभाग सातत्याने कार्यरत राहील, अशी प्रतिक्रीया तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक दिलीप गर्जे यांनी दिली.