महाकाल मंदिराबाहेर भाविकांवर हल्ला!

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
उज्जैन,
mahakal temple मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराच्या गेट क्रमांक १ बाहेर शनिवारी रात्री भाविक आणि रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. शिवम रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या भाविकांचा कर्मचाऱ्यांशी झालेला वाद पुढे हाणामारीत बदलला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर काही भाविक गेट क्रमांक १ बाहेरील शिवम रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी एका मुद्द्यावरून भाविक आणि रेस्टॉरंटमधील कर्मचारी यांच्यात वाद झाला. काही वेळातच परिस्थिती चिघळली आणि दोन्ही बाजूंमध्ये झटापट सुरू झाली.
 
mahakal temple
 
रेस्टॉरंट मालक आणि कर्मचाऱ्यांनी भाविकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गोंधळात महिलांनाही धक्काबुक्की झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनी धातूचे ट्रे आणि इतर जड वस्तूंचा वापर करून भाविकांवर हल्ला केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू झाली असून, महाकाल मंदिर परिसरातील भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित झाला आहे. व्हिडिओमध्ये काही जण एकमेकांशी वाद घालत आणि हाणामारी करताना दिसत आहेत.
 
महाकाल पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, पोलिसांच्या निदर्शनास या घटनेचा व्हिडिओ आला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही व्यक्तीने या प्रकरणी लेखी तक्रार दाखल केलेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर घटनेची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी रात्री घडलेल्या या प्रकारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जेवणाच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाल्याचे सांगितले जात असले तरी, हाणामारीचे नेमके कारण आणि घटनेतील प्रत्येक बाजू पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.