सेलू,
hunger strike of forest workers in hingani हिंगणी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महाराष्ट्र शाखेच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाची जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतली आहे. उपोषणकत्र्यांच्या मागण्यांबाबत संबंधित विभागाकडून आवश्यक कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष भास्कर मुडे यांच्या नेतृत्वाखाली २० जुलै पासून हिंगणी येथे साखळी उपोषण सुरू आहे. उपोषणाला ३१ दिवस उलटूनही मागण्यांवर निर्णय न झाल्याने आंदोलकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. यासंदर्भात ११ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपवनसंरक्षक तसेच सेलू येथील तहसीलदारांना पत्र पाठविण्यात आले. उपोषणकत्र्यांच्या मागण्यांबाबत संबंधित कार्यालयाकडून माहिती घेऊन आवश्यक कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.
वनविभागातील कामगारांच्या प्रलंबित मागण्या, अनेक वर्षे सेवा करूनही हक्कांपासून वंचित असलेले कामगार तसेच वयोवृद्ध कामगारांच्या रोजगार व वेतनासंदर्भातील प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी आंदोलनकत्र्यांकडून करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणाची प्रत पोलिस अधीक्षक, संबंधित वनाधिकारी तसेच राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना माहितीस्तव पाठविली आहे. त्यामुळे आता वनविभागाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे वनकामगारांचे लक्ष लागले आहे.