emotional bank एक काळ असा होता, जेव्हा आपल्या गावाकडच्या किंवा जुन्या पिढीतील माणसांकडे पैशांची श्रीमंती नव्हती. घरे साधी होती, खिशात फारसे पैसे नसायचे. मात्र त्यांच्याकडे एक अफाट श्रीमंती असायची, ती म्हणजे ‘माणसांची श्रीमंती.’ घरात सुख असो वा दुःख, एका हाकेला अख्खं गाव धावून यायचं आणि आज आपल्याकडे बँक खात्यात पैसे आहेत, हातात महागडे फोन आहेत. पण कधी विचार केला आहे का? रात्री-अपरात्री अचानक एखादी अडचण आली किंवा मन खूप उदास झालं, तर हक्काने फोन करावा आणि मन मोकळं करावं, असा किती जणांचा कट्टा आपल्याकडे शिल्लक आहे? तंत्रज्ञानाच्या भाषेत यालाच ‘सोशल बँकरप्टसी’ म्हणजेच ‘सामाजिक आणि भावनिक दिवाळखोरी’ म्हणतात.
आपण नात्यांचे मूल्यमापन सोशल मीडियावरील लाईक्स आणि कमेंट्सवरून करू लागलो आहोत. एखाद्याने आपल्या फोटोवर लाईक टाकलं की आपल्याला वाटतं तो आपला खूप मोठा हितचिंतक आहे. लक्षात ठेवा, हा केवळ एक आभासी देखावा आहे.
सोशल मीडियावरील मित्र तुमच्या वाढदिवसाला मध्यरात्री १२ वाजता शुभेच्छाचे मेसेज पाठवतील, पण जेव्हा तुम्ही खरोखरंच एखाद्या संकटात असता, तेव्हा हे खरंच कामात येतील का? स्क्रीनवर बोटाने हार्टवर क्लिक करणे सोपे असते; प्रत्यक्षात वेळ आणि भावना खर्च कराव्या लागतात, ज्याची आज प्रत्येकाकडे कमतरता आहे. आपण पैशांची गुंतवणूक करतो; जेणेकरून भविष्यात त्याचा फायदा व्हावा; अगदी तसेच नात्यांचेही असते. नात्यांमध्ये पैशांची नाही, तर वेळ, विश्वास आणि भावनांची गुंतवणूक करावी लागते. आपल्या खऱ्याखुऱ्या मित्रांना, नातेवाईकांना, अगदी घरातल्या आई-वडिलांनाही वेळ द्यायला हवा. एकाच घरात, एकाच सोफ्यावर बसून एकमेकांशी बोलण्याऐवजी मोबाईलवर दुसऱ्यांशीच आपण चॅटिंग करीत असतो. नात्यांना जेव्हा वेळ मिळणे बंद होते, तेव्हा ती नाती सुकलेल्या झाडासारखी कोमेजून जातात. आपण आपली ‘इमोशनल बँक’ न भरता फक्त रिकामी करीत चाललो आहोत, हे लक्षात ठेवा.
जेव्हा माणूस सामाजिकदृष्ट्या दिवाळखोर होतो, तेव्हा त्याच्याकडे वरवर पाहायला सगळे काही असते, आतून मात्र तो एकटाच असतो. अति-एकटेपणामुळे तरुणांमध्ये डिप्रेशन आणि मानसिक ताण वाढत असल्याचे अभ्यासातून लक्षात आले आहे. आपण सुखी आहोत हे जगाला दाखवण्यासाठी सोशल मीडियावर सतत छान छान फोटो टाकतो, पण मनातील खरी अस्वस्थता कोणाजवळ मांडू शकत नाही, हे तेवढेच खरे आहे. सणासुदीला प्रत्यक्ष घरी जाणे किंवा फोन करून बोलणे बंद झाले आहे. त्याची जागा आता एकाच वेळी १०० लोकांना पाठवलेल्या ‘रेडिमेड’ व्हॉट्सॲप इमेजेसनी घेतली आहे.emotional bank त्यामुळे स्मार्टफोन बाजूला ठेवून महिन्यातून किमान एकदा तरी आपल्या जवळच्या मित्रांना प्रत्यक्ष भेटा. एकत्र चहा प्या, जुन्या आठवणी काढा आणि खळखळून हसा. कोणाचा वाढदिवस असेल किंवा कोणाचे बरे-वाईट ऐकले, तर थेट फोन करा. तुमच्या आवाजातील जिव्हाळा समोरच्या व्यक्तीला मेसेजपेक्षा जास्त धीर देतो. जेव्हा तुमच्या ओळखीच्या कोणाकडे काही सुखद प्रसंग असेल किंवा दुःखाची वेळ असेल, तेव्हा तिथे प्रत्यक्ष जाण्याचा प्रयत्न करा. माणसाला माणसाची गरज ही अशाच वेळी सर्वात जास्त असते. पैशाच्या श्रीमंतीसोबतच ‘माणसांची श्रीमंती’ जपा; तीच तुमची खरी आणि हक्काची ‘इमोशनल बँक’ आहे.
वीरेंद्र सोनवणे