पत्नीने CCTV बंद केला, भावांना घरी बोलावले आणि...

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Engineer husband dies after being beaten दिल्लीतील निहाल विहार परिसरात ३१ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर विनय गुप्ता यांच्या मृत्यूच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, घटनेपूर्वी विनयची पत्नी रेखाने घरातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद केला होता. त्यानंतर तिचा भाऊ राजू, वेदप्रकाश आणि वहिनी पूनम घरी आले. यानंतर विनयला बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना विनयचा मृत्यू झाला.विनय गुप्ता हे लक्ष्मी पार्क परिसरात राहत होते आणि नोएडा येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी त्यांचा ३१ वर्षीय रेखासोबत विवाह झाला होता. या दाम्पत्याला चार महिन्यांची जुळी मुले आहेत. विनयचे आई-वडील प्रेमचंद आणि रेणू गुप्ता हेही त्यांच्यासोबत त्याच घरात राहत होते.
 
 
deaths
 
पोलिसांच्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी विनयने पत्नी रेखाला त्यांच्या एका मुलाच्या अंगावरील फोडांवर औषध लावण्यास सांगितले. रेखाने त्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रेखा घराबाहेर गेली आणि तिने आपल्या नातेवाईकांना घरी बोलावून घेतले.विनयचे वडील प्रेमचंद यांच्या म्हणण्यानुसार, रेखाचे नातेवाईक विनयशी बोलण्यासाठी आल्याचे सांगत होते. ते पाणी आणण्यासाठी आत गेले असता परत येताना विनयला मारहाण होत असल्याचे त्यांनी पाहिले. विनयची आई रेणू यांनी आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी तिचे म्हणणे ऐकले नाही.
 
रेणू गुप्ता यांच्या आरोपानुसार, विनयची मान पकडून त्याला जमिनीवर ढकलण्यात आले. त्यानंतर पलंगावर फेकून त्याच्या पोटात लाथा आणि ठोसे मारण्यात आले. मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करताना आईलाही ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. मदतीसाठी शेजाऱ्यांना बोलवण्यासाठी त्या बाहेर गेल्या. मात्र, परत आल्यानंतर विनयची प्रकृती गंभीर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी रेखासह राजू, वेदप्रकाश आणि पूनम अशा चार जणांना अटक केली आहे. निहाल विहार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास यंत्रणा घरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच शेजारी आणि कुटुंबीयांचे जबाब तपासत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.