गुदमा-प्रतापबाग रेल्वे मार्गासाठी भूसंपादनावरून शेतकर्‍यांचा संताप

कवडीमोल मोबदल्याला शेतकर्‍यांचा विरोध

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
बाजारभावाच्या पाचपट मोबदल्याची मागणी
 
गोंदिया,
farmers oppose pittance like compensation गुदमा-प्रतापबाग नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होताच परिसरातील शेतकर्‍यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गोंदिया शहराला लागून असलेल्या कटंगी कला, नागरा, हलबीटोला आणि सावरी परिसरातील शेतकरी, भूखंड, घर व दुकानमालकांना गेल्या दोन दिवसांत प्राप्त झालेल्या मोबदला पत्रांमध्ये अत्यल्प रक्कम नमूद करण्यात आल्याने संबंधितांच्या संतापात भर पडली आहे. बाजारभावाच्या तुलनेत कवडीमोल मोबदला देऊन जमीन संपादित करण्याचा प्रयत्न शासन व रेल्वे प्रशासन करीत असल्याचा आरोप प्रभावित भूधारकांनी केला आहे.
 
 
farmers oppose pittance like compensation
 
या पार्श्वभूमीवर रविवारी २३ ऑगस्ट रोजी जवळच्या कटंगी कला ग्रामपंचायत सभागृहात प्रभावित शेतकरी व भूधारकांची तातडीची बैठक घेऊन कमी मोबदल्याच्या मुद्द्यावरून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. योग्य व न्याय्य मोबदला मिळाल्याशिवाय जमीन देणार नसल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. भूसंपादनामुळे जमीन, घर, भूखंड अथवा दुकान गमावणार्‍या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी प्रभावित भूधारकांनी केली असून संपादित होणार्‍या जमीन व मालमत्तेचे मूल्यांकन सध्याच्या बाजारभावाच्या किमान पाचपट दराने करून मोबदला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, एखाद्या शेतकर्‍याच्या जमिनीचा काही भाग रेल्वे मार्गासाठी संपादित झाल्यानंतर उर्वरित जमीन शेतीसाठी अथवा अन्य उपयोगासाठी निरुपयोगी ठरत असल्यास ती संपूर्ण जमीन संपादित करून त्याचाही योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या बैठकीला अखिलेश सेठ, नंदू बिसेन, कार्तिक चौहान, सूरज बावनकर, ईश्वर उपवंशी, मानिकचंद भगत, सुरेश तिवडे, कृष्णा बान्ते, रुपेश लिल्हारे, इमलाबाई लिल्हारे, हेमंतकुमार हनवते, राजू चन्नेकर, रविंद्रकुमार चिकलोंडे यांच्यासह कटंगी कला, नागरा, हलबीटोला व सावरी येथील शेकडो प्रभावित भूधारक उपस्थित होते.
 
 
पांदण रस्ते बंद होण्याची चिंता
नवीन रेल्वे मार्गामुळे शेतांकडे जाणारे पारंपरिक पांदण रस्ते बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत. यासाठी रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना शेतकर्‍यांना सोयीचे ठरतील असे पर्यायी रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.
 
 
अन्यथा ३१ ऑगस्टला रस्ता रोको
आपल्या मागण्यांसंदर्भात प्रभावित शेतकर्‍यांचे शिष्टमंडळाकडून सोमवारी २४ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकार्‍यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार आहे. त्या ३० ऑगस्टपर्यंत शासन-प्रशासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता कटंगी नाका (बालाघाट रोड) येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.