अकोला
ganesh wagh अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी, ग्रामीण भागातील मर्यादित शैक्षणिक सुविधा आणि महागड्या खासगी शिकवणीचा आधार नसतानाही जिद्द, सातत्य आणि नियोजनबद्ध अभ्यासाच्या जोरावर वाशीम जिल्ह्यातील आडगाव हजारे येथील गणेश भाऊराव वाघ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यांनी राज्यात २९वा क्रमांक पटकावत राज्यकर निरीक्षक पदासह श्रेणी-१मधील विविध पदांसाठी आपली निवड निश्चित केली.
गणेश वाघ यांचे प्राथमिक शिक्षण आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंत झाले. त्यानंतर कोकलगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे सरस्वती महाविद्यालयातून त्यांनी समाजकार्य विषयात पदवी संपादन केली.
पदवीसोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी
पदवीचे शिक्षण सुरू असतानाच गणेश यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. ग्रामीण भागातून एमपीएससीची तयारी करताना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा मर्यादित होत्या. तरीही या अडचणींना अडथळा न मानता त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध साधनांचा वापर करत सातत्याने अभ्यास केला. ध्येय निश्चित ठेवून चिकाटी आणि नियोजनाच्या आधारे त्यांनी तयारीला दिशा दिली.
लिपिकाची नोकरी मिळाली, तरी अधिकारी होण्याचे स्वप्न कायम
६ ऑक्टोबर २०२५ रोजी गणेश वाघ यांची आयटीआयमध्ये लिपिक म्हणून नियुक्ती झाली. नोकरी मिळाल्यानंतर अनेक जण उपलब्ध संधीवर समाधान मानतात; मात्र गणेश यांनी श्रेणी-१ अधिकारी होण्याचे स्वप्न कायम ठेवले. नोकरीची जबाबदारी सांभाळत त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला.मे २०२६ मध्ये त्यांनी एमपीएससीची मुख्य परीक्षा दिली. १४ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या निकालात त्यांच्या परिश्रमांना यश मिळाले आणि त्यांनी राज्यात २९वा क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामुळे दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक श्रेणी-१ तसेच राज्यकर निरीक्षक या पदांसाठी त्यांची निवड झाली आहे.
गणेश वाघ यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. मर्यादित सुविधा असूनही सातत्यपूर्ण प्रयत्न, आत्मविश्वास आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळविता येते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले. त्यांच्या मते, “सुविधा कमी असल्या तरी जिद्द मोठी असेल, तर यशाला पर्याय नसतो.”