बख्तियारपूरमध्ये सासू-सुनेसह ६ महिन्यांच्या बाळाचा होरपळून मृत्यू

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
बख्तियारपूर,
Fire in Bakhtiyarpur बिहारमधील बख्तियारपूर येथे शनिवारी रात्री घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने परिसर हादरला. ओल्ड बायपास परिसरातील बाईक पार्ट्सच्या दुकानाला आणि त्यामागील घराला अचानक आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केल्याने घरातील व्यक्तींना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत ४५ वर्षीय रीमा देवी, त्यांच्या ७० वर्षीय सासू गीता देवी आणि सहा महिन्यांच्या सुंदरी कुमारीचा जळून मृत्यू झाला.पाटणापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या बख्तियारपूरमध्ये ही घटना घडली. बाईक पार्ट्सचे दुकान पंकज कुमार यांच्या मालकीचे असून, दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या घरात त्यांचे कुटुंब राहत होते. शनिवारी संध्याकाळी अचानक दुकान आणि घराला आग लागली. पाहता पाहता आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घराला वेढा दिला.
 
 
Fire in Bakhtiyarpur
 
आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी काही जण घराच्या छतावर पोहोचले. त्यानंतर बाळाचे आई-वडील मोनी कुमारी आणि शिवम कुमार यांनी छतावरून उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र, या प्रयत्नात मोनी कुमारी यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन तो मोडला. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांची सुंदरी कुमारी आपल्या आई-वडिलांसोबत बख्तियारपूर येथे आली होती. तिची आई मोनी कुमारी आणि वडील शिवम कुमार हे हिसुआ, नवादा येथील रहिवासी आहेत. मात्र, आगीचा वेग इतका प्रचंड होता की रीमा देवी, गीता देवी आणि चिमुकली सुंदरी कुमारी यांना बाहेर पडता आले नाही.
 
 
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये रीमा देवी या दुकानदार पंकज कुमार यांच्या पत्नी, तर गीता देवी त्यांच्या आई असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा तपास करत असून आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेत आहेत. या दुर्घटनेनंतर बख्तियारपूर परिसरात शोककळा पसरली असून, सासू, सून आणि अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.