बांग्लादेशमध्ये हिंदू कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
रंगपूर,
Four Hindu die in Bangladesh बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. निवृत्त शिक्षक गणपती चक्रवर्ती, त्यांची पत्नी प्रीतिलता, २३ वर्षीय मुलगी आगामी चक्रवर्ती प्रथी आणि १२ वर्षीय मुलगा प्रियम चक्रवर्ती यांचे मृतदेह शनिवारी रात्री त्यांच्या बंद घरातून पोलिसांनी बाहेर काढले. चौघांचेही मोबाईल गुरुवार रात्रीपासून बंद असल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला होता. मात्र, घरात प्रवेश केल्यानंतर चौघेही मृतावस्थेत आढळले.रंगपूर शहरातील दशपाडा अर्थात मच्छुआपाडा परिसरात ही घटना घडली. शनिवारी रात्री सुमारे ११.३० वाजता पोलिसांनी घराचे बाहेरील कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. गणपती चक्रवर्ती यांचे वय ६५, पत्नी प्रीतिलता यांचे वय ५०, मुलगी आगामीचे वय २३, तर मुलगा प्रियम हा १२ वर्षांचा होता.
 
 
Four Hindu die in Bangladesh
 
 
गणपती चक्रवर्ती हे रंगपूर जिल्हा शाळेत शिक्षक होते. गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी ते सेवेतून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून काम सुरू केले होते. त्यांची मुलगी आगामी हिने यावर्षी रंगपूर येथील कारमायकल कॉलेजमधून इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. तर प्रियम हा रंगपूर जिल्हा शाळेत इयत्ता पाचवीत शिकत होता.कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, प्रीतिलता यांच्याशी गुरुवारी दुपारी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर गुरुवार रात्रीपासून घरातील चारही मोबाईल फोन बंद होते. त्यामुळे नातेवाईकांची चिंता वाढली. शनिवारी रात्री कुटुंबीय दशपाडा परिसरातील घरी पोहोचले. घराचे मुख्य प्रवेशद्वार बंद होते आणि घरातील दिवेही बंद होते. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
 
 
प्रीतिलता यांच्या धाकट्या बहिणी पूजा चक्रवर्ती यांनी या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. गणपती चक्रवर्ती यांचे कोणाशीही वैर नसल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबातील चौघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याबाबत कोणतीही माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.या घटनेनंतर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभाग आणि गुप्तचर शाखेने तपास सुरू केला आहे. रंगपूर महानगर कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नाझमुल कादर यांनी सांगितले की, सध्या चारही मृतदेह पोलिसांच्या ताब्यात असून घटनेबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. तपास पुढे गेल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि परिस्थिती स्पष्ट होईल. दरम्यान, रंगपूर महानगर सीआयडीचे प्रभारी सुबीर चौधरी यांनी मृतदेह कोणत्या परिस्थितीत आढळले याची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रीतिलता आणि आगामी यांचे मृतदेह जिन्याजवळ आढळले, गणपती चक्रवर्ती यांचा मृतदेह छतावर होता, तर १२ वर्षीय प्रियमचा मृतदेह पलंगाखाली सापडला. त्यामुळे या घटनेचे गूढ अधिकच वाढले असून, चौघांच्या मृत्यूमागील नेमके कारण तपास यंत्रणा शोधत आहेत.