पुणे /मुंबई
national teachers award 2026 नावीन्यपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी केलेले उल्लेखनीय कार्य आणि शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत महाराष्ट्रातील चार शिक्षकांची यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बीडच्या कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२६ सालच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशभरातून यंदा ४८ शिक्षकांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शिक्षक दिनानिमित्त, ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील चारही पुरस्कारप्राप्त शिक्षक वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. शिवप्रसाद टिंगरे सातारा येथील सैनिकी शाळेत अध्यापन करतात. वैभव कुलकर्णी लातूरच्या पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयात कार्यरत आहेत. कविता गिट्टे बीड जिल्ह्यातील केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात, तर कुंदा बच्छाव नाशिक महापालिकेच्या आनंदवल्ली शाळा क्रमांक १८ मध्ये कार्यरत आहेत.
लोकसहभागातून ५० लाखांचा निधी; वंचित विद्यार्थ्यांना मदतीचा हात
कुंदा बच्छाव यांनी गेल्या काही वर्षांत लोकसहभागातून सुमारे ५० लाख रुपयांचा निधी उभारून तो वंचित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी वापरला. शिक्षणापासून दूर असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच १५० मुलींना शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्यात आली. या मदतीच्या बळावर अनेक मुलींनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेतले असून काही विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्येही यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट उपस्थिती प्रणाली विकसित करण्याबरोबरच लोकसहभागातून कौशल्य प्रयोगशाळा उभारण्यात आली. या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि त्रिमितीय मुद्रणासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळते. शाळेत ध्वनिमुद्रण स्टुडिओही उभारण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रफितीला देशपातळीवर सर्वोत्तम ठरल्याचे बच्छाव यांनी सांगितले. कला शिक्षणासाठी क्यूआर कोडची निर्मिती करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याचा आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले
कविता गिट्टे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने काम केले आहे. दरवर्षी वाडी-वस्त्यांवर सर्वेक्षण करून शाळाबाह्य मुला-मुलींना शोधून त्यांना शाळेत दाखल करण्याचे काम केले जाते. त्यांच्या विद्यालयात सुमारे ४०० विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण घेतात
या प्रयत्नांमुळे हजारो मुले शिक्षित होऊन स्वावलंबी झाली असून अनेक विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड झाली आहे. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्यामुळे अनेक बालविवाह रोखण्यातही मदत झाली. ऊस तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोयत्याऐवजी मुलांच्या हातात संगणकाचा माउस आला, अशी भावना गिट्टे यांनी व्यक्त केली.कोणतीही अपेक्षा न ठेवता आतापर्यंत काम केले; मात्र राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या माध्यमातून त्या कार्याची दखल घेतली गेल्याने आजवरच्या प्रयत्नांना फळ मिळाल्याचे समाधान असल्याचे गिट्टे यांनी सांगितले.
नावीन्यपूर्ण अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कार्याचा गौरव करणारा हा पुरस्कार महाराष्ट्रातील या चार शिक्षकांच्या कामाची राष्ट्रीय पातळीवरील दखल अधोरेखित करणारा ठरला आहे.