निज्जर हत्येचा कट आम्हीच रचला!

गोल्डी ब्रारचा दावा

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Goldy Brar's claim कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येबाबत गँगस्टर गोल्डी ब्रारने धक्कादायक दावा केल्याचे समोर आले आहे. एका कथित लीक ऑडिओमध्ये ब्रारने निज्जरच्या हत्येमागे त्याची टोळी असल्याचे म्हटले आहे. निज्जर १६-१७ वर्षांच्या मुलांचा वापर ड्रग्ज विक्रीसाठी करणाऱ्या व्यक्तींना पाठिंबा देत असल्याचा आरोपही ब्रारने केला आहे.ब्रारच्या दाव्यानुसार, संबंधित व्यक्ती तरुणांना ड्रग्ज विकण्यासाठी तसेच खबरे बनण्यासाठी ब्लॅकमेल करत होते. निज्जर अशा लोकांना मदत करत असल्यामुळे त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे ब्रारने ऑडिओमध्ये म्हटल्याचे सांगितले जाते.
 
 
 

goldi 
त्याच्या म्हणण्यानुसार, या कारणामुळे त्याने आणि त्याच्या टीमने निज्जरची हत्या केली. प्रत्येकाला आपल्या कृत्यांची किंमत चुकवावी लागते, असेही ब्रारने म्हटल्याचे समोर आले आहे. हरदीप सिंग निज्जरची १८ जून २०२३ रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाच्या सरे येथे गुरुद्वाराबाहेर हत्या झाली होती. या प्रकरणात कॅनडाने भारतीय सरकारी एजंट्सवर आरोप केले होते; मात्र भारताने हे आरोप फेटाळून लावत पुरेसे पुरावे नसल्याचे म्हटले होते. भारतीय सूत्रांनी यापूर्वी निज्जरच्या हत्येमागे टोळीयुद्ध किंवा संघटित गुन्हेगारीचा संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली होती. आता समोर आलेल्या कथित ऑडिओमुळे या प्रकरणातील तपासाला नवा आयाम मिळण्याची शक्यता आहे.