H1N1चा दिल्लीला विळखा? १,७७७ रुग्णांमुळे सतर्क

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
H1N1 hits Delhi राजधानी दिल्लीत स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये इन्फ्लूएंझा एचे २,३९२ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १,७७७ रुग्ण H1N1 म्हणजेच स्वाइन फ्लूचे आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता दिल्ली सरकारकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालये आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करून रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आवश्यक डॉक्टर, खाटा आणि औषधांची पुरेशी व्यवस्था असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 

fku 
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, यावर्षी दिल्लीत इन्फ्लूएंझा एचे २,३०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये शुक्रवारपर्यंत नोंद झालेल्या H1N1 च्या १,७७७ हून अधिक रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, केवळ गुरुवारी H1N1 चे ११४ रुग्ण आढळले आहेत.स्वाइन फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना श्वसनासंबंधी स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंड झाकणे, साबण आणि पाण्याने नियमित हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे आणि श्वसनविकाराची लक्षणे असलेल्या व्यक्तींपासून जवळचा संपर्क टाळणे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. तसेच डोळे आणि नाकाला वारंवार हात लावणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी पुरेसे द्रवपदार्थ घ्यावेत, असेही सांगण्यात आले आहे. ताप, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास, अंगदुखी किंवा डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.