पुलगाव,
hunger strike देवळी तालुक्यातील गुंजखेडा येथे गेल्या दीड महिन्यांपासून नागरिकांना गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतल्या जात नाही. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती गटविकास अधिकार्यांकडे धाव घेतली असून पिण्यासाठी स्वच्छ पाणी न मिळाल्यास उपोषणाचा इशारा निवेदनातून दिला आहे.
गुंजखेडा येथे गेल्या दीड महिन्यांपासून नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत आहे. पाणी पुरवठा होत असलेल्या वर्धा नदीमध्ये दूषित पाणी आहे का? आपल्याकडे जलशुद्धीकरण प्लांट नाही का? एवढे मोठे जलशुद्धीकरण असतानाही दूषित पाणी पुरवठा होणे म्हणजे, प्रशासनाची हलगर्जी नाही का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहे. नागरिकांनी ग्रामपंचायत सचिव व प्रशासकांना अनेकवेळा याबाबतची माहिती दिली. मागील ग्रामसभेत सुद्धा हा मुद्दा गाजलेला आहे. परंतु, अद्याप यावर कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.
दूषित पाण्यापासून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कर पूर्ण वर्षाचा वसूल केला जातो मात्र, गावामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. हे सत्र मागील ७ ते ८ वर्षांपासून सुरू आहे. प्रशासनाने तात्काळ या घटनेची गंभीर दखल घेऊन नागरिकांना पिण्याच्या शुद्ध जल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन पं. स. चे गटविकास अधिकारी आणि जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती आमदार राजेश बकाणे, जिल्हाधिकारी वान्मथी सी., पुलगावचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
तीन दिवसात पिण्याचे शुद्ध पाणी न मिळाल्यास उपोषण
येत्या दोन-तीन दिवसात शुद्ध पाण्याचा पुरवठा न झाल्यास नागरिकांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी निवेदनातून दिला आहे.