दिल्ली
ak-203 भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांना संरक्षण क्षेत्रात मोठे यश मिळाले आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी येथील कोरवा दारूगोळा कारखान्यात पूर्णपणे स्वदेशी घटक आणि कच्च्या मालाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या 100 टक्के स्वदेशी ‘AK-203’ असॉल्ट रायफलची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या रायफलला ‘शेर’ असे नाव देण्यात आले आहे. भारत आणि रशियाच्या संयुक्त विद्यमाने 2019 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड’ अर्थात IRRPLने या रायफलची निर्मिती केली आहे.
या ऐतिहासिक कामगिरीची माहिती IRRPLचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक मेजर जनरल एस. के. शर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. “आम्हा सर्वांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. 100 टक्के भारतीय सुटे भाग आणि कच्च्या मालाचा वापर करून तयार केलेल्या पहिल्या AK-203 ‘शेर’ रायफलची आम्ही यशस्वी चाचणी घेतली आहे. केवळ काही ठराविक भागांचे स्थानिकीकरण न करता, संपूर्ण रायफलची 100 टक्के स्वदेशी निर्मिती करण्यात आली आहे. हा खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर भारत’चा जिवंत पुरावा आहे,” असे मेजर जनरल एस. के. शर्मा यांनी म्हटले आहे.
AK-203 ही 7.62x39 मिमी कॅलिबरची आधुनिक, गॅस-ऑपरेटेड असॉल्ट रायफल आहे. कलाश्निकोव्ह मालिकेची विश्वासार्हता आणि आधुनिक युद्धतंत्राला पूरक रचना ही या रायफलची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ही रायफल एका मिनिटात सुमारे 700 राऊंड फायर करण्याची क्षमता ठेवते, तर 800 मीटरपर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात आले आहे. आधुनिक टेलिस्कोपिक साइट्स आणि विविध अॅक्सेसरीज जोडण्यासाठी मॉड्युलर रेल्सची सुविधाही या रायफलमध्ये आहे.
भारतीय लष्करात अनेक ak-203 वर्षांपासून वापरल्या जाणाऱ्या जुन्या ‘इन्सास’ रायफल्सच्या तुलनेत AK-203 अधिक प्रभावी असल्याचे सांगितले जाते. वजनाने हाताळण्यास सोपी असण्यासोबतच अत्यंत प्रतिकूल हवामानातही प्रभावीपणे काम करण्यासाठी तिची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय लष्करातील जुन्या इन्सास रायफल्सची जागा स्वदेशी AK-203 ‘शेर’ रायफल्स घेणार आहेत.
दरम्यान, या स्वदेशी रायफलच्या सिंगल आणि बर्स्ट फायरिंग चाचण्या यशस्वी झाल्या असून त्यांचे प्राथमिक निष्कर्ष अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे मेजर जनरल एस. के. शर्मा यांनी सांगितले. सप्टेंबर 2026 पर्यंत लष्कराच्या चाचण्यांसाठी 100 टक्के स्वदेशी बनावटीच्या या रायफल्सचे नमुने सोपवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
उत्पादन क्षमतेबाबतही IRRPLने मोठे ak-203 लक्ष्य ठेवले आहे. लवकरच दर 100 सेकंदाला एक AK-203 ‘शेर’ रायफल तयार करण्याची क्षमता विकसित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उत्पादन क्षमता वाढवणे आणि उत्पादन प्रक्रियेत अधिक सुलभता आणल्यामुळे भारतीय लष्कराला पुरवल्या जाणाऱ्या 6 लाख रायफल्सची डिलिव्हरी निर्धारित वेळेच्या तब्बल एक वर्ष आधी पूर्ण करणे शक्य होणार असल्याचेही मेजर जनरल शर्मा यांनी स्पष्ट केले.
संरक्षण क्षेत्रातील आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने ही कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे. पूर्णपणे भारतीय सुटे भाग आणि कच्च्या मालापासून तयार झालेली AK-203 ‘शेर’ रायफल ही भारताच्या संरक्षण उत्पादनातील वाढत्या स्वावलंबनाचे आणखी एक उदाहरण ठरणार आहे.