न्यूयॉर्क,
Indian youth murdered in New York अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रुकलिन परिसरात पिझ्झा डिलिव्हरीचे काम करणाऱ्या २७ वर्षीय पंजाबी तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गुरदीप सिंग असे मृत तरुणाचे नाव असून तो पंजाबमधील बेगोवाल भागातील रहिवासी होता. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गुरदीपचा मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबीयांनी मदतीचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजून ५८ मिनिटांनी ब्रुकलिनमधील ८९९ क्रेसेंट स्ट्रीटजवळ गोळीबाराची घटना घडली. न्यूयॉर्क पोलिस विभागाला एका व्यक्तीवर अनेक गोळ्या झाडल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले. तेथे गुरदीप सिंग गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.
आपत्कालीन वैद्यकीय पथकाने त्याला वन ब्रुकलिन हेल्थ-ब्रुकडेल हॉस्पिटल मेडिकल सेंटरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास न्यूयॉर्क पोलिसांकडून सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. प्राथमिक तपासात दरोड्याच्या प्रयत्नातून ही घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, गोळीबारामागील नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.गुरदीप सिंग सुमारे १३ वर्षांपूर्वी अमेरिकेत गेला होता. परदेशात जाण्यासाठी त्याच्या कुटुंबाने कर्ज घेतले होते. अमेरिकेत मेहनत करून आई-वडिलांना आर्थिक आधार देणे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे, हे त्याचे ध्येय होते. सुरुवातीच्या अडचणींवर मात करत तो पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत होता आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत होता.गुरदीपच्या मृत्यूची बातमी पंजाबमधील त्याच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. गुरदीपचा मृतदेह लवकरात लवकर पंजाबमध्ये आणण्यात यावा आणि या हत्येतील आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.