जलाभिषेक करताच निघून गेला क्षीण....

कावड यात्रेने भंडाऱ्यात जय बम बोले

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
भंडारा,
kawad yatra खांद्यावर कावड, मुखात हर हर महादेवाचा गजर आणि मनात भगवान बहिरंगेश्वराला जलाभिषेक स्वहस्ते करण्याची जिज्ञासा अशा भक्तिमय वातावरणात भंडारा शहरातून शेकडो कावडदाऱ्यांची कावड यात्रा काढण्यात आली. सहा ते आठ किलोमीटर चे अंतर पायी कापल्यानंतरही जरा सुद्धा थकवा न दिसता, चेहऱ्यावर दिसणारी भगवंताच्या दर्शनाची आस बहिरंगेश्वरावरील निस्सीम श्रद्धाच सांगून जात होती.
 
 
kawad yatra
 
भंडारा शहराचे ग्रामदैवत असलेल्या बहिरंगेश्वर मंदिरातील भगवान बहिरंगेश्वराला पवित्र अशा श्रावण महिन्यात गंगा जलाचा अभिषेक करण्याच्या दृष्टीने कावळ यात्रा काढण्याची परंपरा मागील काही वर्षांपासून जोपासली जाते. भंडारा कावड मंडळाच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात येते. आज ही यात्रा अत्यंत उत्साहात काढण्यात आली. कारधा येथील वैनगंगा नदीतील जल कावडधारींनी जलपात्रात भरल्यानंतर गंगेची आरती करण्यात आली. त्यानंतर शेकडो कावडधारी महिला व पुरुष बहिरंगेश्वराच्या दिशेने मार्गस्थ झाले. भोलेनाथाचा जय जयकार, खांद्यावर कावड आणि मनात भगवंताला जलाभिषेक करण्याची तीव्र इच्छा अशा उत्साही वातावरणात सहभागींनी वैनगंगा नदी ते बहिरंगेश्वर मंदिर असे अंतर कापले.
 
 
ठिकठिकाणी कावड यात्रेवर पुष्प वर्षाव करण्यात आला. यात्रेतील पारंपारिक पद्धतीची डफरी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती. पडणाऱ्या पावसातही शिवभक्तांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मंदिरात पोहोचल्यानंतर सर्व कावडधारींनी स्वतःच्या हस्ते महादेवाला जलाभिषेक केला. यावेळी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. अभिषेकानंतर महाआरती करून महाप्रसाद वितरित करण्यात आला. कावड यात्रेने भंडारा नगरातील वातावरण शिवमय झाले होते.