बहावलपूरमधील जैशचा अड्डा पुन्हा सजला!

११ कोटींच्या खर्चाने मुख्यालयाचे नूतनीकरण

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
बहावलपूर,
Jaish's base set up in Bahawalpur ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई हल्ल्यामुळे नुकसान झालेल्या पाकिस्तानातील बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदच्या मरकज सुभानअल्लाह या मुख्यालयाचे पुन्हा नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या छायाचित्रांमध्ये या परिसरातील दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. मशिदीवरील बाहेरील घुमटांची पुनर्बांधणी करण्यात आली असून, बीटर कॉम्प्लेक्सचाही कायापालट करण्यात आला आहे.मुख्यालयातील मध्यवर्ती सभागृहात भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या सभागृहाच्या भिंतींवरील भगदाडे बुजवून त्यावर प्लास्टर आणि रंगकाम करण्यात आले आहे. तसेच भिंतींना संगमरवरी स्वरूप देण्याचे कामही करण्यात आले आहे. मे महिन्यात या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी मध्यवर्ती सभागृहातील हल्ल्यामुळे पडलेली मोठी छिद्रे बुजवण्याचे काम सुरू होते.
 
 
 

Jaish 
 
ऑपरेशन सिंदूरनंतर सुमारे एक वर्ष आणि तीन महिन्यांनी जैश-ए-मोहम्मदचे हे मुख्यालय पुन्हा कार्यरत झाल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान सरकारकडून जैश-ए-मोहम्मदला टप्प्याटप्प्याने २५ कोटी रुपये देण्यात आले. यातील ११ कोटी रुपये केवळ मध्यवर्ती सभागृहाच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात आल्याची माहिती आहे.भारतीय हवाई कारवाईत नुकसान झालेल्या परिसरातील इतर बांधकामांवरही काम सुरू करण्यात आले आहे. मुख्यालयाजवळील निवासी इमारत आणि मदरसा अल-साबिर या दोन्ही इमारती पाडण्यात आल्या असून, त्यांच्या जागी पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझर आजारी असल्यामुळे संघटनेच्या मुख्यालयाचा कारभार सध्या त्याचे दोन धाकटे भाऊ तलहा अल-सैफ आणि मोहिनुद्दीन औरंगजेब उर्फ अम्मार अल्वी पाहत असल्याची माहिती आहे. मसूद अझर आणि त्याचा धाकटा भाऊ रऊफ असगर सध्या सिंधमधील नवाबशाह येथे लपून बसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.