३८व्या वर्षी कर्ण शर्माचा क्रिकेटला अलविदा

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
karn sharma भारताचा लेग-स्पिनर कर्ण शर्मा याने वयाच्या ३८व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताकडून त्याने एक कसोटी, दोन एकदिवसीय आणि एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. २०१४ मध्ये भारतासाठी अखेरचा सामना खेळल्यानंतर त्याला पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नाही. मात्र, देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली.
 
karn sharma
 
कर्ण शर्मा यूपी टी-२० लीगदरम्यान निवृत्तीची घोषणा केली. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, २५ ऑगस्ट रोजी तो आपल्या संघाकडून अखेरचा सामना खेळणार आहे. त्यानंतर तो क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून अधिकृतपणे दूर होईल. निवृत्तीची माहिती देताना कर्णने आपल्या कुटुंबासह बीसीसीआय, रेल्वे, यूपीसीए, आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनसह संपूर्ण कारकिर्दीत साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. भविष्यात प्रशिक्षण तसेच क्रिकेटशी संबंधित इतर जबाबदाऱ्यांसाठी आपण उपलब्ध राहणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
 
कर्ण शर्माला भारताकडून फार कमी सामने खेळण्याची संधी मिळाली. चार आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने एकूण पाच बळी घेतले. कसोटी सामन्यात त्याच्या नावावर चार बळी असून, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने एक बळी घेतला. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी-२० क्रिकेटमध्ये कर्ण शर्माने मिळून ५५१ बळी घेतले आहेत. त्याने ९७ प्रथम श्रेणी सामन्यांत २७० बळी मिळवले. १२३ लिस्ट ए सामन्यांत त्याने १५३ बळी घेतले, तर १९१ टी-२० सामन्यांत त्याच्या नावावर १६८ बळी आहेत.
 
आयपीएलमधील कर्ण शर्माची कारकीर्दही विशेष ठरली. सलग तीन वर्षे तीन वेगवेगळ्या संघांकडून खेळताना त्याने आयपीएलचे विजेतेपद मिळवले. २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद, २०१७ मध्ये मुंबई इंडियन्स आणि २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा भाग असताना त्याने ट्रॉफी जिंकली. त्यामुळे वेगवेगळ्या संघांकडून सलग तीन वर्षे आयपीएल विजेतेपद मिळवणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश झाला. त्याने आयपीएलमधील अखेरचा सामना २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला.