कृष्णभक्तांनो, मुहूर्त चुकवू नका!

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
Krishna Janmashtami on September 4 श्रावण महिन्यातील सण-उत्सवांची सुरुवात झाल्यानंतर आता भाविकांना कृष्ण जन्माष्टमीची उत्सुकता लागली आहे. धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस भगवान कृष्णाची जयंती म्हणून मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. यंदा कृष्ण जन्माष्टमी शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी साजरी होणार आहे.
 
 
 
Krishna Janmashtami on September 4
वैदिक पंचांगानुसार अष्टमी तिथी ४ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजून २५ मिनिटांनी सुरू होऊन ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून १३ मिनिटांपर्यंत राहणार आहे. याच दिवशी रोहिणी नक्षत्र मध्यरात्री १२ वाजून २९ मिनिटांनी सुरू होऊन रात्री ११ वाजून ४ मिनिटांपर्यंत असेल. श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याची धार्मिक मान्यता असल्याने याच काळात जन्माष्टमीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. यंदा पूजेचा शुभ मुहूर्त रात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून मध्यरात्री १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत असेल.
 
 
जन्माष्टमीच्या दिवशी भाविक उपवास करून रात्री बाळकृष्णाची पूजा करतात. मध्यरात्रीच्या सुमारास श्रीकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालून नवीन वस्त्रे परिधान केली जातात. त्यानंतर मोरपीस, बासरी आणि तुळशीची पाने अर्पण करून बाळगोपाळाला झोपाळ्यावर झोका दिला जातो. माखन-मिश्री, पंजिरी आणि खिरीचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते. अनेक भाविक मध्यरात्री पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात, तर काही जण ५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून १ मिनिटानंतर उपवास सोडतात.