मुसळधार पावसाने लाखांदूरला झोडपले

नाल्याचा पूर ७ घरांत शिरला; चिंचोली मार्ग ३ तास बंद!

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
लाखांदूर,
lakhandur lashed by torrential rain गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर ता.२३ ऑगस्ट रोजी लाखांदूर तालुक्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या एक तासाच्या तुफानी पावसाने लाखांदूर शहराला पार झोडपून काढले. या पावसामुळे शहरातील नाले तुडुंब भरून वाहू लागले, तर वॉर्ड क्रमांक ६, ८ आणि ९ मधील तब्बल सात नागरिकांच्या घरांमध्ये व अंगणात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
 
 
lakhandur lashed by torrential rain
 
अनेक वर्षांची समस्या; नालेसफाईचे वाजले तीन तेरा
पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने शहरातील रस्ते जलमय झाले होते. अवघ्या तासाभराच्या पावसाने नगरपंचायतीच्या नालेसफाई आणि पावसाळी नियोजनाचा पोलखोल केला आहे. वॉर्ड क्र. ६, ८ आणि ९ मध्ये पावसाचे पाणी रस्त्यावरून ओसंडून वाहत थेट लोकांच्या घरात शिरले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात नाल्याचे पाणी घरात घुसण्याचा त्रास सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप यावर कोणताही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही, ज्यामुळे दरवर्षी नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
 
 
शहरांतर्गत नाले तुडुंब भरून राहिल्याने लाखांदूर-चिंचोली अंतर्गत पोहोच मार्ग तब्बल तीन तास बंद पडला होता. यामुळे प्रवाशांचे व वाहनधारकांचे हाल झाले. सुदैवाने, दोन तासांनंतर पाण्याचा निचरा होऊन पूर ओसरल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. प्रशासनाच्या उघड्या पडलेल्या नियोजनामुळे संतापलेल्या नागरिकांनी नाल्याची समस्या तात्काळ सोडवून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे.