जवानांच्या हातात ‘शेर’!

१००% स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी चाचणी

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |

नवी दिल्ली,
Lion in the hands of soldiers भारतीय लष्कराच्या शस्त्रसज्जतेत लवकरच मोठी भर पडणार आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या १०० टक्के स्वदेशी बनावटीच्या AK-203 ‘शेर’ असॉल्ट रायफलची यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील कोरवा येथील आयुध कारखान्यात या रायफलची निर्मिती करण्यात आली आहे. भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमातून स्थापन झालेल्या इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडने ही रायफल विकसित केली आहे.
 
 

Lion in the hands of soldiers 
 
इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडचे CEO मेजर जनरल एस. के. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शेर’च्या निर्मितीत वापरण्यात आलेले घटक आणि कच्चा माल पूर्णपणे भारतीय आहे. रायफलच्या ऑटोमॅटिक तसेच बर्स्ट-फायरिंग चाचण्यांचे निकालही प्रभावी ठरले आहेत. कंपनीकडून उत्पादनाचा वेग वाढविण्याची तयारी सुरू असून दर १०० सेकंदाला एक AK-203 रायफल तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या वेगामुळे भारतीय लष्कराला नियोजित वेळेच्या जवळपास एक वर्ष आधी ६,००,००० रायफल्स मिळण्याची शक्यता आहे.
 
भारतीय लष्करात दीर्घकाळ वापरल्या जाणाऱ्या इन्सास रायफल्सची जागा आता ‘शेर’ घेणार आहे. अंतिम चाचणीसाठी सप्टेंबरमध्ये लष्कराला AK-203 रायफल्सचा विशेष संच देण्यात येणार आहे. या रायफलचा फायर रेट प्रति मिनिट ७०० गोळ्यांपर्यंत असून ती ८०० मीटरपर्यंतच्या पल्ल्यावर प्रभावीपणे लक्ष्य साधू शकते. कलाश्निकोव्ह प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता, आधुनिक एर्गोनॉमिक्स, टेलिस्कोपिक आणि माउंटेड साइट्ससाठी मॉड्यूलर रेल्स तसेच अचूक लक्ष्यभेदाची क्षमता या रायफलीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.