नागपूर,
Low pressure in the Bay of Bengal नागपूर, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी वाढण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने आज उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिक येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नागपूर जिल्ह्यात मागील दोन दिवस झालेल्या हलक्या ते मध्यम पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. २३ ऑगस्ट रोजी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून आज आणि उद्या विदर्भातील काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. २६ ते २८ ऑगस्टदरम्यान विदर्भातील बहुतांश भागांत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. २२ ऑगस्टच्या मध्यम पावसामुळे नागपूरचे तापमान ५ अंश सेल्सियसने घसरले असून आतापर्यंत १३.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात पावसाची शक्यता वाढली असली तरी नागपूरकरांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गोंदियात २२ ऑगस्टच्या रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असून २३ ऑगस्टला पावसाचा जोर वाढला. या पावसामुळे धान पिकाला फायदा होण्याची शक्यता असून धरणांमधील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात २९ आणि ३० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ५३५ गावांतील ४१ हजार ५५६ शेतकऱ्यांच्या ३६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, तूर तसेच बागायती आणि बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाले. पंचनाम्यानंतर जिल्हा प्रशासनाने ३१ कोटी ५५ लाख रुपयांच्या मदतीचा अहवाल शासनाकडे पाठवला आहे. यंदा सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने पेरण्या उशिरा झाल्या, त्यानंतर पावसाचा खंड, बोगस बियाण्यांमुळे पिकांचे नुकसान आणि आता अतिवृष्टी अशा संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाकडून मदत कधी मिळणार, याकडे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.