नवी दिल्ली,
Modi praises India's space power राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीय आणि शास्त्रज्ञांना शुभेच्छा देत भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले. भारताच्या अंतराळ प्रवासाने आता नव्या टप्प्यात प्रवेश केला असून, देशाने मोठी स्वप्ने पाहत नव्या तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करावी, असे मोदी यांनी म्हटले. यावेळी त्यांनी विशेष व्हिडीओ शेअर करत ‘नवीन कालचक्राची सुरुवात’ असल्याचे सांगितले.दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. २३ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले होते. या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला. याच यशाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. २३ ऑगस्ट २०२६ रोजी मोदी यांनी भारताची जागतिक अंतराळ क्षेत्रातील भूमिका अधिक मजबूत होत असल्याचे सांगितले.
मोदी यांनी देशातील तरुणाई आणि खासगी अंतराळ क्षेत्राचेही विशेष कौतुक केले. जनरेशन झेडमधील अभियंते, डिझाइनर, कोडर आणि शास्त्रज्ञ प्रोपल्शन सिस्टीम, कंपोझिट मटेरियल्स, रॉकेट स्टेजेस आणि सॅटेलाइट प्लॅटफॉर्म यांसारख्या क्षेत्रांत नवे तंत्रज्ञान विकसित करत असल्याचे त्यांनी सांगितले. २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अंतराळ क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा देत इस्रोचे शास्त्रज्ञ, तरुण अभियंते आणि उद्योजकांच्या योगदानाचे कौतुक केले.