मोहाडी
mohadi helicopter emergency landing तालुक्यातील करडी-मोहगाव शेतशिवारात आज 23 रोजी एका हेलिकॉप्टरचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टर नागपूर वरुन रायपूरकडे जात होते सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झालेले नाही. हवामान आणि तांत्रिक कारणाने हे लँडिंग करण्यात आल्याची माहिती आहे.
हेलिकॉप्टर हवेत असताना अचानक तांत्रिक बिघाड किंवा हवामानातील बदलामुळे वैमानिकाला आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घ्यावा लागला. वैमानिकाने अत्यंत सतर्कता आणि प्रसंगावधान दाखवत करडी-मोहगाव लगत असलेल्या बिसारी तलावा जवळ "व्हीटी पीबीएन" हे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे खाली उतरवले. वेळीच वैमानिकाला सुरक्षित जागा सापडल्याने संभाव्य अपघात टळला. शेजारीच तलाव असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता ही नाकारता येत नव्हती. तीन ते चार जणांचा समावेश होता आणि ते सर्व सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. हेलिकॉप्टर एका खाजगी कंपनीचे असल्याचे समजते.
गावाच्या जवळ अचानक हेलिकॉप्टर उतरल्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही वेळातच हेलिकॉप्टर पाहण्यासाठी लहान मुलांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली. लोकांनी आपापल्या मोबाईलमध्ये या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ टिपण्यासाठी एकच गर्दी केली होती.